'उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर...'; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 01:08 PM2022-07-06T13:08:03+5:302022-07-06T13:08:29+5:30
लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
मुंबई- राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे एकूण ५० आमदार आणि भाजपानं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमच्या व्हिपचं उल्लंघन करणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
विधानसभेत बहुमत सिद्ध करताना आमच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. खरी शिवसेना आम्ही आहोत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांवर कारवाई करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील सर्व बंडखोर आमदार सुरुवातीपासूनच आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेना पक्ष सोडलेला नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहे. याचपार्श्वभूमीवर बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीने एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. तुम्ही म्हणता की तुम्ही शिवसेनेत आहात, उद्धव ठाकरे म्हणताहेत की ते शिवसेनाप्रमुख आहे. तुमच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत?, असं एकनाथ शिंदे यांना विचारलं. त्यावर असं आमचं काहीच म्हणणं नाही. लोकशाहीत बहुमताला मान असतो. ते आमच्याकडे आहे, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र लढवण्याची तयारी दाखवली तर तुम्ही जाल का?, असा सवाल विचारला असता, ज्या पद्धतीने ते आमच्यावर आरोप करताहेत, आमच्यावर टीका करताहेत, आम्हाला गटनेते पदावरून काढून टाकलंय, आमचे पुतळे जाळताहेत. मला नाही वाटत त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटातील बंडखोर आमदारांसह अन्य नेते आपापल्या मतदारसंघात, गावी परतत असून, त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. विविध माध्यमातून गेल्या काही दिवसांतील सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर पुन्हा एकदा भाष्य केलेले आहे. आम्ही काहीही बेकायदा केलेले नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांदरम्यानही विरोधकांनाच फटकारण्यात आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पक्षाशी गद्दारी केली नाही-
मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही आणि तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे जळगावच्या सभेत म्हणाले होते की, आघाडी सरकारमुळे राज्याची १५ वर्षे सडली. मग अशावेळी आम्ही किती दिवस तुमच्याबरोबर बसणार होतो, असा सवाल शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला केला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना मी बाहेरून तीन मते आणली पण ते पडले. आमच्यातले लोक म्हणत होते की जो (संजय राऊत) आला तो पडायला पाहिजे होता. विधान परिषदेत आम्ही दोघांनाही निवडून आणले, पक्षाशी गद्दारी केली नाही, असे शिंदे म्हणाले.