सुविधांचा नाही ठावठिकाणा, कुणासाठी केला उद्घाटनाचा घाट; अंधेरीच्या कामगार रुग्णालयातील वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:48 PM2023-08-19T12:48:42+5:302023-08-19T12:50:34+5:30
अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी येथे ओपीडी सुरु करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी येथे ओपीडी सुरु करण्यात आली. १४ ऑगस्ट रोजी या विभागाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला, पण हा विभागही पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. या रुग्णालयातील सर्व सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. हे रुग्णालय पूर्ववत सुरु व्हावे यासाठी कामगार संघटना पाठपुरावा करत असून हे प्रकरण न्यायालयात गेले आहे म्हणून रुग्णालय सुरु करत असल्याचा देखावा करून कामागारांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, वस्तुस्थिती वेगळी असल्यानेच उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव, राज्य कामगार मंत्री रामेश्वर तेली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मान्यवरांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. या प्रकरणाची मुंबईत उच्च न्यायालयात २३ ऑगस्ट रोजी सुनावणी असल्याने घाईघाईने रुग्णालय सुरु केल्याचा देखावा करण्यासाठी हे उद्घाटन केल्याचा आरोप शर्मा यांनी केला. १७ डिसेंबर २०१८ मध्ये या रुग्णालयाला आग लागून मोठी दुर्घटना झाली होती. त्यांनतर या रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, पण रुग्णालय सुरु करण्यास मात्र चालढकल केली जात आहे. रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन, सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होतील अशी अपेक्षा होती, परंतु पुन्हा एकदा विमाधारकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
कर्मचाऱ्यांची भरतीच झालेली नाही
शस्त्रक्रिया व आंतर रुग्ण विभागासाठी विमाधारकांना आताही कांदिवली रुग्णालयच गाठावे लागणार आहे. बाह्य रुग्ण विभागातील सेवाही पूर्णपणे मिळतील की नाही याची शाश्वती नाही. बऱ्याच सुपरस्पेशालिटी सेवा येथे उपलब्ध नाहीत. सिटीस्कॅन, एम. आर. आय, २ डी इको यासारख्या चाचण्या व रक्तपेढी सारख्या सुविधा ज्या २०१८ पूर्वी येथे उपलब्ध होत्या त्याही येथे लवकर सुरू होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अग्निशमन विभागाचीही पूर्ण परवानगी मिळालेली नाही. डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरतीही झाली नसल्याने येथील सेवेवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.