मुंबई - महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन झालंय. पूरामुळे १०० पर्यंत लोकं मृत्युमुखी पडलेत. वादळाचं थैमान आहे. अशावेळी राज्यात सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असणे म्हणजे सरकार नाही. १२ दिवस झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टात अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ देणे हे घटनाबाह्य आहे हे शिवसेनेने राज्यपालांना कळवलं आहे. राज्यपाल कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते आता राज्यपाल कुठे आहेत? असा टोला संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, सरकार बेकायदेशीर आहे. विश्वासघाताने हे सरकार बनलं आहे. सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. ज्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांना मंत्रिपद देऊ नये. असे झाले तर ते नियमबाह्य आहे. राज्यपाल १२ दिवस गप्प का? राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी राजभवनातून बाहेर पडलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी सांगितले.
द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यामागं राजकारण नाहीद्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यामागे कुठलाही राजकीय हेतू अथवा नफा तोट्याचं गणित नाही. अत्यंत मागास भागातून आदिवासी समाजातून येणाऱ्या महिलेला नेतृत्व मिळत असेल तर त्याचं समर्थन करण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नेते आदिवासी भागात काम करतात. त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यामागे राजकारण नाही. आम्ही एनडीएचा भाग नाही असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
आदिवासी समाजातील महिलेला बहुमान मिळत आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. राजकारणापलीकडे जाऊन हा निर्णय घेतला. याआधी शिवसेनेने काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदावर योग्य व्यक्ती बसत असेल तर त्यांचा सन्मान करणं ही शिवसेनेची परंपरा आहे. आदिवासी समाजाप्रती असलेल्या भावनेतून आम्ही पाठिंबा दिला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. १५ नव्हे तर ११५ खासदार संपर्कात असतीलशिवसेनेचे १५ खासदार एकनाथ शिंदे यांच्यात संपर्कात आहेत असा प्रश्न पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना विचारला असता १५ नव्हे तर ११५ खासदार संपर्कात असतील. या देशातील निम्मे खासदार संपर्कात असतील असा चिमटा संजय राऊतांनी काढला.