मुंबई : पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी काही अपवाद वगळता मुंबईकरांना पोलीस ठाण्यात बोलावले जाऊ नये, असे ट्वीट शनिवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केले. त्यावर इतक्या झटपट बदलांची सवय आम्हाला नाही असे सांगत ‘थोडा सास तो लेने दो सर’ या शब्दांत नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
शनिवारी दुपारी पांडे यांनी हे ट्वीट केले. ज्यात ‘#पासपोर्ट पडताळणी. आम्ही निर्णय घेतला आहे की कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले जाणार नाही. तसे घडल्यास याची मला तक्रार करा’ असे ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे. पांडे यांच्या या ट्वीटनंतर ‘मग अधिकाऱ्यांसमोर कागदपत्रांसह हजर न राहताच पडताळणी कशी होणार?’ असा सवाल एका युझरने आयुक्तांना केला.
त्यावर पोलीस कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येईल, जर कागदपत्रांत काही तफावत असेल तर त्याच्या पूर्ततेसाठी तुम्हाला फोन येईल’ असे उत्तर पांडे यांनी दिले. ज्यावर खुश झालेल्या युझरने ‘इतक्या कमी वेळात इतक्या झटपट बदलांची आम्हाला सवय नाही, जरा सास तो लेने दो सर,’ असे म्हणत धन्यवाद दिले. त्यावर मुंबईकर म्हणून गेल्या अनेक काळापासून माझ्या मनात हा विषय होता आणि त्याबाबत अनेकांना सल्लाही दिला होता, म्हणून निर्णय घेतल्याचे पांडे यांनी सांगितले.
या संवादानंतर एकाने आप अब तक कहा थे सर? असे म्हटले, तर तुमचा कार्यकाळ वाढविण्यासाठी काही याचिकेची तरतूद आहे का, अशी विचारणा केली. अनेकांनी पांडे यांचे आभार मानत पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात आलेले अनुभव, लांब रांगा, संबंधित पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कसे मागे लागावे, लागायचे याचा अनुभव पोलीस आयुक्तांकडे शेअर केले.