लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, मुंबई महापालिकेनेदेखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवाने देण्यास आरंभ केला आहे. घरगुती गणेशमूर्तींसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. घरगुती गणेशमूर्तींसाठी दोन फूट उंचीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती. आता मर्यादा नसली तरी स्वत:हून दोन फूट उंचीची मर्यादा पाळण्याबाबत महापलिकेने आवाहन केले आहे.
मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भातील सुधारित मार्गदर्शिका जारी केली आहे. त्यानुसार, गणेश मंडळांना मंडपाच्या परवानगीसाठी शंभर रुपये शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. जर यापूर्वी मंडळांनी शुल्क भरून पावती घेतली असेल तर अशा मंडळांना शंभर रुपये परत केले जातील. मूर्तिकारांच्या मंडपासाठाचे शुल्क प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्ण माफ केले जाईल. या अगोदर ज्यांनी शुल्क भरले आहे त्यांना त्याचा परतावा केला जाईल.
विसर्जन स्थळी रोषणाईची व्यवस्था महापालिकेच्या मंडप उभारणीबाबत खासगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्कही माफ करण्यात येईल. नैसर्गिक विसर्जन स्थळी, कृत्रिम स्थळी विद्युत रोषणाईची व्यवस्था केली जाईल. आगमन आणि विसर्जन रस्त्यावर आवश्यक दिवाबत्तीची सोय केली जाणार आहे. मंडप शुल्क माफ केले असले तरी विविध परिपत्रकांतील अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.