मुंबई : रेश्मा खान प्रकरणात मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे, सहआयुक्त देवेन भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊनही योग्यरीत्या तपास होत नसल्याचा आरोप करत, तक्रारदार निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुरुलकर यांनी नवनियुक्त आयुक्त संजय पांडे यांच्याकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी सोमवारी नव्याने तक्रार देत, जबाब बदलून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी वर्तवला.
कुरुलकर यांच्या तक्रारीनुसार, रेश्मा खानने भारतात प्रवेश करत बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पुरावे मालवणी पोलीस ठाण्यात देऊनही तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू नये म्हणून आदेश असल्याचे सांगत कारवाई केली नाही. तसेच तत्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी याबाबत पाठपुरावा करू नये यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे.
मालवणी पोलिसांनी रेश्मा खानसह देवेन भारती आणि फटांगरे तसेच अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी गुन्हा सीआययूकडे वर्ग केला. मात्र, याचा योग्यरीत्या तपास होत नसल्याचा आरोप कुरुलकर यांनी केला आहे. याबाबत पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे नव्याने लेखी तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे. कुरुलकर यांच्या तक्रारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये दलालाच्या टोळीकडून घुसखोर बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म दाखला मिळवून भारतात प्रवेश दिला जातो, ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.
आरोपी महिलेचा पती भाजपचा पदाधिकारी आहे आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे ही बाब देशाच्या सुरक्षेशी संबंधित असतानाही, त्या दृष्टीने तपास करण्यात आला नाही. याबाबत अधिक कलमेही लावली नाही. यादरम्यान तपास अधिकारी प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांना भेटून तपासाबाबत चौकशी केली. तसेच माहिती अधिकारातून पुरवणी जबाबाची मागणी केली. मात्र, वरिष्ठांनी पुरवणी जबाबाची प्रत देणे टाळले. त्यामुळे जबाबात बदल करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
तसेच स्वतःसह कुटुंबीय, वकील यांना पोलीस संरक्षण मिळण्याबाबत अर्ज करूनही पोलीस मदत मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. गुन्ह्यातील आरोपी हे प्रभावशाली असल्याने त्यांच्या दबावाखाली येऊन ठाणे पोलीस आयुक्तांनी पोलीस संरक्षण नाकारल्याचेही त्यांनी अर्जात म्हटले. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करून कारवाईची विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.