मुंबई - शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज रत्नागिरीतून सुरुवात झाली. आदित्य यांच्या स्वागतासाठी रत्नागिरीत ठिकठिकाणी बॅनर झळकले असून, यातील एक बॅनर चर्चेचा विषय ठरला. सध्या गाजत असलेल्य स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुकांत सावंत यांचा फोटो या बॅनरवर असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्यावरुन, खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आदित्य यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा गद्दार म्हणत निशाणा साधला. आता, आदित्य ठाकरेंच्या टिकेला शिंदे गटानेही प्रत्युत्तर दिलं आहे.
जल्लोष कोणीही दाखवू शकतो, जल्लोष आणि मतदान यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे, तुम्ही मंत्री असताना काय केलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. गद्दार, खोके हे सांगण्यासाठी लीडरशीप नसते. लीडरशीप ही राज्याचा विकास करण्यासाठी असते. जी लीडरशीप राज्याचा विकास करू शकते, तीच जनतेचं हित करत असते, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे.
जनतेच्या भावनांवर राज्य करण्याची वेळ आता निघून गेलीय, तो एक काळ होता, जनतेच्या भावना भडकावून तुम्ही राज्य करायचा. आता, पीढी बदललीय, या पीढिला स्वत:चं हित कळतं. मंत्री म्हणून तुम्ही तुमची कामगिरी सांगत सगळीकडे फिरा, असा सल्लाही केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिला.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे
जे झालं ते झालं, जी गद्दारी झाली ती झाली. आजची गर्दी पाहून एवढच सांगू इच्छितो की येथे शिवसेनाचा जिंकून येणार. मला आज याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला दिसून येत आहेत, म्हणजे येथील महिला भगिनींनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, असे म्हणत आदित्य यांनी भाषणाची सुरुवात केली. तसेच, माझा हा कोकणातील दुसरा दौरा असून यापूर्वीही मी कोकण दौरा केला. निष्ठा यात्रेत, शिवसंवाद यात्रेतून मी कोकणात आलो होते. त्यावेळी, या गद्दारांचा मला मेसेज यायचा, मला निरोप यायचा की. आम्हाला विश्वासघातकी म्हणा पण गद्दार म्हणू नका, अहो किती हा निर्लज्जपणा... अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी आणि बंडखोरांवर तोफ डागली.