हौसेला मोल नाही, आवडीच्या नंबरसाठी लोक मोजतात लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:01 AM2024-01-16T11:01:38+5:302024-01-16T11:03:55+5:30
फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ, एकाच नंबरसाठी अनेक अर्ज.
मुंबई : प्रत्येकाला आपल्या आवडीचा नंबर हवा असतो. काही जण तर त्यासाठी वेगळे पैसे मोजायला तयार असतात. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशा वेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. गेल्या वर्षभरात मुंबईकरांनी लाखो रुपये मोजले आहेत.
दुचाकी व चारचाकी संवर्गातील नवीन सिरिजमध्ये गणले जाणारे पसंती क्रमांक वाहनधारकांसाठी उपलब्ध असतात. वाहनचालक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नियमाप्रमाणे शुल्क भरून पसंती क्रमांक घेऊ शकतात.
‘या‘ नंबरला सर्वाधिक पसंती :
वाहनधारकांचा ९, ९९, ९९९, ९९९९, ७८६, ८०५५ अशा विविध नंबरकडेही ओढा दिसतो. अनेक जण जन्म तारीख, आपल्या पूर्वीच्या वाहनाचा क्रमांक घेण्यासही प्राधान्य देतात. सर्वसामान्य वाहनधारकांकडून १५ ते ५० हजारांदरम्यान शुल्क असलेला नंबरला प्राधान्य दिले जाते.
जास्त पैशांचा धनादेश, त्याला मिळताे क्रमांक :
मुंबईत ९, ९९, ९९९,९९९९ या क्रमांक मालिकेला दरवर्षी मोठी मागणी असते, तसेच ११११, ११, १, ८०५५, ७८६ हे क्रमांकही मोठ्या प्रमाणात घेतले जातात. एखाद्या क्रमांकाला एकापेक्षा जास्त जणांनी मागणी केलेली असेल, तर ज्याने जास्त पैशांचा धनादेश दिलेला आहे.
काही ठरावीक नंबरकडे वाहन चालकांचा अधिक कल पाहायला मिळतो. दादा, नाना अशा प्रकारच्या नावाच्या नंबरची जास्त खरेदी होत होती. मात्र, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आल्याने त्यावर कुठलेही डिझाइन करता येत नाही.