'शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही'; मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 04:02 PM2022-08-22T16:02:51+5:302022-08-22T16:03:10+5:30
आता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साद घातली तर येऊ देत..मग बघू, असं उत्तर दिलं. शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर पुन्हा एका शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खुद्द राज ठाकरेच या सर्व विषयावर उद्या पत्रकार परिषदेत भाष्य करणार असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे या मनसेच्या अधिकृत प्रवक्त्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्यात काही अर्थ नाही, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
शर्मिला ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे हे काय बोलल्या, ते काही मी ऐकलं नाही. तसेच कोणाच्या घरगुती विषयांबाबत आमच्यासारख्या व्यक्तीनं बोलणं योग्य नाही. मात्र आज ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना सर्व बाजूनं घेरण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. अशावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं महाराष्ट्र उभा आहे. अशावेळेला जर त्यांचे कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, कोणत्याही गोष्टीचा राग मनात न ठेवता जर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहिले, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याचा नक्कीच आनंद होईल, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
'...तर नक्कीच आनंदच होईल'; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भास्कर जाधवांचं विधान https://t.co/4w7f5jG4hF
— Lokmat (@lokmat) August 22, 2022
कोरोना काळात मंत्री लपून बसले होते- शर्मिला ठाकरे
कोरोना काळात आपले सगळे मंत्री लपून बसले होते, फक्त आरोग्यमंत्री टोपे बाहेर दिसायचे. तेव्हा आमच्या पक्षाच्या लोकांनी रस्त्यावर स्टॉल टाकून रेमेडीसिव्हिर इंजेक्शन, बेड मिळवून देणे, पीपीई किट देणे, मृतदेहांची विल्हेवाट लावण्यापासून सगळं केलं. यात आमच्या पक्षातील काही तरुण पोरं गेलीत. त्यामुळे ज्यांना आमचा पक्ष दिसत नाही, त्यावर आम्ही काहीच उपाय करू शकत नाही. तेव्हाही पक्ष होता आणि आताही असल्याचं त्यांनी सांगितलं.