Join us

मनीष मार्केट येथे ‘त्या’ कक्षाचा प्रस्ताव नाही, महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 2:18 PM

‘मनीष मार्केटच्या बाजूचा तो भूखंड कुणाच्या घशात’ या मथळ्याखाली १३ ऑक्टोबरच्या ‘लोकमत’च्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशासनातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले.

मुंबई : मनीष मार्केट परिसरात आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष उभारण्याचे कोणतेही काम प्रस्तावित करण्यात आलेले नाही. मनीष मार्केटशेजारील भूखंडात आरक्षणात सुधारणा करण्याविषयी विकास नियोजन विभागाने प्रस्ताव सादर केला आहे. असे असले तरी, ही सुधारणा प्रस्तावित स्वरूपाची आहे. प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती, सूचना यांचा विचार करून राज्य सरकारकडे पुढील मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे मुंबई महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.‘मनीष मार्केटच्या बाजूचा तो भूखंड कुणाच्या घशात’ या मथळ्याखाली १३ ऑक्टोबरच्या ‘लोकमत’च्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशासनातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले.पालिकेच्या ‘ए’ वॉर्डात ११५.५९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड हा ‘पालिका कार्यालय, पालिका चौकी आणि आपत्कालीन नियंत्रण सुविधा’ या प्रयोजनासाठी, मंजूर विकास आराखड्यामध्ये आरक्षित करण्यात आला आहे. या आरक्षणात महापालिका कार्यालय हे प्रमुख, तर  पालिका चौकी व आपत्कालीन नियंत्रण सुविधा हे दुय्यम प्रयोजन आहे.

विभागांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष-  पालिका मुख्यालयात विस्तारित इमारतीत दुसऱ्या मजल्यावर सुसज्ज आपत्कालीन विभाग आहे. -  मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात काही बिघाड झाल्यास, समन्वय व संदेश वहनाचे कामकाज खंडित होऊ नये, याकरिता परळ येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण केंद्र यासाठी चार मजली इमारत आहे. -  आपत्कालीन व्यवस्थापन विकेंद्रीकरणाअंतर्गत २४ प्रशासकीय विभागांमध्ये स्थानिक गरजेनुरूप आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष आहेत. हा तपशील विचारात घेता, आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रयोजन पूर्ण केले आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका