मोदी-शाहांच्या देशनिष्ठेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, पण...; शिवसेनेचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:33 AM2022-05-12T07:33:42+5:302022-05-12T07:34:22+5:30
शिखांना खलिस्तानी म्हणायचे व मुसलमानांना दाऊदचे हस्तक म्हणून हिणवायचे, यातून राजकारणी बाहेर कधी येणार? असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.
मुंबई - पंजाबात जे घडते आहे त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) व गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी गांभीर्याने पाहायला हवे. राज्यात सरकार कोणाचेही असो, राष्ट्रीय सुरक्षा व एकात्मता याबाबत कोणत्याही प्रकारचे राजकारण होता कामा नये. मोदी-शाहांच्या देशनिष्ठा आणि उद्दिष्टय़े यांच्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, पण अनेकदा या सगळ्यांवर राजकीय सूडभावना मात करते असा आरोप शिवसेनेने सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर केला आहे.
तसेच पंजाबात विधानसभा जिंकता आल्या नाहीत असे लोक खलिस्तानची भुताटकी उकरून लोकसभा जिंकू पाहत आहेत काय? हीसुद्धा शंका आहेच. मुंबई-महाराष्ट्रात दाऊदच्या नावाने धाडसत्र सुरू झाले आहे. कुठे दाऊद, कुठे खलिस्तान यातच सध्या राजकारण गुंतले आहे. मूळ प्रश्नांचा विसर त्यामुळे पडतो. संपूर्ण देश खलिस्तान व दाऊदच्या विळख्यात असेल तर ते केंद्र सरकारचे अपयश आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
पंजाबात एकेकाळी खलिस्तानच्या नावाखाली रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. अनेक पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, लष्करी अधिकारी, पत्रकार, जनतेस दिवसाढवळय़ा मारण्यात आले.
इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य, मुख्यमंत्री बिआंत सिंह यांच्या हत्या झाल्या. पंजाबच्या भूमीवरून संपलेला खलिस्तानवाद आता कोण उचकटून काढत आहे? त्यामागे कोणाचा हात आहे? पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यात अस्थिरता आणि अशांतता असणे देशाला परवडणारे नाही.
गेल्या काही दिवसांत तेथे घडणाऱ्या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. पंजाबात ‘आप’चे सरकार आल्यापासून दहशतवादाने डोके वर काढले. खलिस्तान्यांचे झेंडे तेथे फडकले हे चित्र बरे नाही. मंगळवारी पंजाबमधील मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट झाला.
त्याआधी सोमवारी पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटच्या मुख्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला. याचदरम्यान हिमाचल प्रदेशातील शिमला येथेही खलिस्तानी झेंडे फडकविल्याचे आढळून आले. पंजाबची सूत्रे याक्षणी अनुभव नसलेल्या लोकांच्या हाती आहेत. त्याचाही फायदा कालपर्यंत बिळात लपून बसलेले छुपे खलिस्तानवादी घेत असावेत.
याच काळात पंजाबात ‘ड्रोन’च्या माध्यमातून खलिस्तान समर्थनाची पत्रके टाकण्यात आली व ठिकठिकाणी याबाबत गोपनीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे. नशेबाजी व अमली पदार्थांच्या विळख्यात पंजाबचा तरुण सापडला आहे आणि त्यामागेही पाकिस्तान-चीनचा हात आहे.
एकेकाळी देशाच्या संरक्षण दलात शिखांचा सहभाग सर्वाधिक होता. सैन्यात दाखल होण्यासाठी पंजाबच्या गावोगावच्या तरुणांचे जथे भरती केंद्रावर जमा होत. आज या तरुणांना नशेने विळखा घालावा हे दुर्दैव आहे व त्यांच्या डोक्यात आता खलिस्तानचा किडा सोडला जात आहे.
अतिरेक्यांच्या गोळय़ांना जे बळी पडले त्यांचे नातेवाईक पंजाबात आजही आहेत. हे सर्व पाहून त्यांना आता काय वाटत असेल? ज्या पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंग यांनी एकेकाळी इंग्रजांशी लढून हिंदुस्थानचे स्वातंत्र्य राखले त्याच पंजाबमध्ये हिंदुस्थानशी शत्रुत्व करणारे लोक कसे निर्माण होऊ शकतात?
त्यांना चीन आणि पाकिस्तान सर्व प्रकारचे सहाय्य करीत आहे, हे गृहीत धरले तरी मग आमचे दिल्लीचे सरकार त्यावर कोणती कारवाई करत आहे? कॅनडात आजही खलिस्तानवाद्यांचे केंद्र आहे. तसे ते लंडन व अमेरिकेतही आहे. तेथून सर्व सूत्रे हलवली जात आहेत.
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. त्यात पंजाबातील शीख शेतकरी आघाडीवर होता. हे शीख म्हणजे खलिस्तानी आहेत व त्यांना खलिस्तानवाद्यांकडून अर्थपुरवठा होत असल्याची विधाने भाजपचे पुढारी करीत होते. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी अशी बकवास करणाऱ्यांना वेळीच रोखायला हवे होते.
शिखांना खलिस्तानी म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम केले, पण त्यातून शीख समाजात एक ठिणगी पडली याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले नाही. शिखांना खलिस्तानी म्हणायचे व मुसलमानांना दाऊदचे हस्तक म्हणून हिणवायचे, यातून राजकारणी बाहेर कधी येणार?
इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांचा नेता भिंद्रनवालेला सुवर्ण मंदिरात घुसून मारले. तेव्हा कोठे खलिस्तानवाद्यांचा आगडोंब शांत झाला. पाकिस्तानात घुसून दाऊदला मारण्याची हिंमत आताचे राज्यकर्ते दाखवणार आहेत काय? ते त्यांना शक्य नाही. उलट त्यांच्या डोळय़ांदेखत खलिस्तानचे भूत जिवंत झाले आहे.
हे गाडलेले मढे कोणी राजकीय स्वार्थासाठी उकरून काढीत असतील तर तो राष्ट्रद्रोहच आहे! लोकांची डोकी ठिकाणावर येत नाहीत तोपर्यंत तेच या अपयशाला राष्ट्रवाद मानत राहतील!