सचिन लुंगसेमुंबई :
२४ तास जागे राहणाऱ्या मुंबईत रोज रात्री तब्बल दीड लाख लोकांना झोपण्यासाठी जागा मिळत नाही. हे कटू वास्तव आहे. दर १ लाख लोकसंख्येमागे एक निवारागृह असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही पायदळी तुडवला जात आहे. लाखाला एक निवारागृह या न्यायाने मुंबईत १२५ निवारागृहांची गरज असताना प्रत्यक्षात फक्त २३ निवारागृहे आहेत.महापालिकेच्या लेखी मुंबईतील बेघरांचा आकडा ५४ हजार ४१६ आहे. प्रत्यक्षात मात्र सेंटर फोर प्रमोटिंग डेमोक्रसी संस्थेच्या मते दीड लाख बेघर आहेत. त्यांना फुटपाथ, पुल, मंदिर, स्टेशन असे जागा मिळेल तेथे ऊन, थंडी, पावसात आडोसा शोधावा लागतो. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केला, मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रश्न सुटत नाही.
महापालिकेने २०१० ते २०२० या दहा वर्षांत फक्त २३ निवारे चालविले जात आहेत. या निवारागृहांत राहत असलेल्या बेघरांचा आकडा एक हजाराच्यांही वर जात नाही. यावरून बेघरांची अवस्था लक्षात यावी. महापालिकेने बांधलेली २३ निवारागृहे स्वयंसेवी संस्था चालवत आहेत.९३२ एकूण क्षमता ७५० राहणाऱ्यांची संख्या
महापालिकेचा आकडा दिशाभूल करणारा आहे. स्वयंसेवी संस्थाच्या पाहणीनुसार, तो जवळपास दीड लाख आहे. २०११ साली हा आकडा २ लाखांच्या आसपास होता. मात्र बेघर स्थलांतरित झाल्याने आता हा आकडा दीड लाखांवर आला आहे. या बेघरांकडे कोणतेच पुरावे नसल्याने त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे त्यांना मोफत धान्य सुविधा आणि शासकीय योजनाही मिळत नाहीत. - जगदीश पाटणकर, समन्वयक, सेंटर फोर प्रमोटिंग डेमोक्रसी (सीपीडी)
‘आम्ही आता जागेचा शाेध घेण्यास सुरुवात करू’मुंबईत मोठ्या प्रमाणात जागेच्या समस्या आहेत. मात्र त्याही पुढे जाऊन आपण अशा काही जागा शोधत आहोत तेथे बेघरांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. नियोजन विभाग नव्याने अशा जागांचा शोध घेण्यास सुरुवात करणार आहे. वेगवेळ्या १२५ जागा शोधण्यापेक्षा एखादी मोठी जागा शोधत त्या ठिकाणी अशा प्रकाराच्या सुविधा थोड्या जास्तीच्या संख्येने करता येतील का? हाही विचार आम्ही करत आहोत. आता पुढील भूमिका ठरवून नियोजन विभाग कामाची आखणी करणार आहेत. थोडक्यात १२५ निवारे गृह बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. बेघरांना आश्रय देण्याची आमची तयारी आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.- प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त, नियोजन विभाग, मुंबई महापालिका