Join us

शिंदे-फडणवीस सरकारमुळे टक्के खाण्यास स्कोप नाही, राणेंचा ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 2:49 PM

मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, पण आमच्यासाठी नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबई -  शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेतील काराभारावरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील रस्त्यांसाठी ५ हजार कोटी रुपयांचे टेंडर काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते टेंडर निघालंही होतं. मात्र, आता ते डेंटर रिकॉल करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच, सध्या मुंबई महापालिकेतील कामकाजावर कोणाचं नियंत्रण आहे, कोण येथील प्रशासन चालवत आहे, येथील कामकाजाच्या कागदांवर कोणाच्या सह्या होत आहेत? असे अनेक सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले. नगरसेवकांच्या १७०० कोटी रुपयांच्या निधीवरही आदित्य यांना प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर, आता भाजप आणि शिंदे गटाकडून पलटवार करण्यात आला आहे. 

मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, पण आमच्यासाठी नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, आदित्य ठाकरेंनी केलेल्या टिकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुंबई महापालिकेत टक्के खाण्याचा काही स्कोपच राहिलेला नाही हे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना समजले आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर 1700 कोटी हे मुंबईच्या 227 वार्डमध्ये समान पद्धतीने वाटप करावं असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सगळ्या वॉर्डला आता न्याय मिळणार, असल्याचे नितेश राणेंनी म्हटले. तसेच, आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचंही ते म्हणाले. राणेंनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

९ महिन्यांपासून स्थायी समितीचा व्यवहार बंद

गेले ९ महिने स्थायी समितीचा व्यवहार बंद आहे. त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली असून त्यातूनच आदित्य ठाकरेंकडून अशी वक्तव्य केली जात आहेत, असे शिंदे गटाचे नेते आणि मुंबईतील आमदार अमित साटम यांनी म्हटले आहे. तसेच, तुम्हाला ट्रान्सफरवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे 

आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याकडे लक्ष वेधले. महापालिकेतील कामकाजावर कोणाच्या सह्या होत आहेत. कोण येथील निविदा प्रक्रिया आणि विकास कामांच्या ऑर्डर देत आहे? असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मुंबईतील रस्त्यांसाठी काढण्यात आलेल्या 5 हजार कोटींच्या टेंडरचं काय झालं, हे टेंडर का रिकॉल करण्यात आले, असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला. तसेच, मुंबई महापालिकेत सध्या ३ टी वर काम सुरू आहे. टेंडर, ट्रान्सफर आणि टाइमपास या तत्त्वावर सध्या मुंबई महापालिकेचं कामकाज सुरू आहे. खोके सरकारकडून सध्या महापालिकेतील कामावर कुठलीही स्पष्टता आलेली नाही. गेल्या ३ महिन्यात मुंबईत किती इन्फास्ट्रक्चरची कामे करण्यात आली, त्याला मंजुरी कोणी दिली, त्याची प्रक्रिया कशी झाली, असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.  

१७०० कोटींच्या कामातही गडबड

नगरसेवकांच्या हक्काच्या १७०० कोटी रुपयांचीही गडबड झाल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मुंबईला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला, मुंबईला नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच मुंबईचं खच्चीकरण करण्याचं काम खोके सरकारकडून होत आहे. मुंबई महापालिकेत सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ३ व ४ महिन्यात केल्या जात आहेत. खोके सरकारकडून केवळ टाइमपास सुरू आहे. मुंबई ही तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी असेल, पण ती आमच्यासाठी आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे. त्यामुळेच, आमच्या महाविकाआघाडी सरकारमध्ये मुंबईतून ५ जणांना मंत्री करण्यात आलं होतं. मुंबईतील विकासकामांवरही भर देण्यात आला होता, असे आदित्य यांनी सांगितले.  

टॅग्स :नीतेश राणे आदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिकाएकनाथ शिंदे