- रतींद्र नाईकलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांची निर्मिती करणाऱ्या डासांचा खात्मा करण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभाग युद्धपातळीवर काम करत असतो. मुंबईसारख्या विकसनशील शहरात दररोज गगनाला भिडणारे टोलेजंग टॉवरमध्ये या लपलेल्या डासांचा व त्यांच्या उत्पत्तीस कारण असलेल्या ठिकाणांचा नाश करणे मात्र कीटकनाशक विभागाला शक्य होत नाही. यामुळेच आता मुंबई महापालिकेने डास मारण्यासाठी २४ वॉर्डांत सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांना हाताशी घेतले आहे.
मुंबईत सुमारे ४ हजार इमारती बांधकामाधीन असून, इमारतींच्या बांधकाम साइटवर डासांचा प्रादुर्भाव आढळून येतो. पालिकेच्या कीटकनाशक विभागाला दर आठवड्याला साइटवर जाऊन डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावी लागतात. त्यासाठी पालिकेने विविध सामाजिक संस्थांशी ७ आणि ५ महिन्यांसाठी करार केला आहे.
पावसाळ्यासाठी ३८४ स्वयंसेवकपालिकेच्या कीटकनाशक विभागात १५९४ कर्मचारी असून, हे कर्मचारी मुंबईतील २४ वॉर्डांत फवारणीचे काम करतात. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे पालिकेने पावसाळी कामांसाठी ३८४ स्वयंसेवक तर इमारतीच्या बांधकाम साइटवर फवारणीचे काम करण्यासाठी ८२९ स्वयंसेवक नेमले आहेत.
पावसाळ्यात काम काय मुंबईतील मोकळ्या जागा असो किंवा मिल असो तसेच इमारती असो या ठिकाणी साचलेल्या पाण्यातील डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करणे, टायर, करवंटी इतकेच काय तर इतर भांड्यात साचलेले पाणी या स्वयंसेवकांकडून नष्ट केले जाते. पावसाळाच नव्हे तर इतर दिवशीही विविध जागी किटकनाशक विभागाकडून फवारणीची माेहिम राबविली जाते.
आम्हाला टार्गेट नसते एका कर्मचाऱ्याने माहिती देताना सांगितले की, याबाबत या कामाचे आम्हाला कोणतेही टार्गेट नसते. दिवसभरात आम्ही दोन ते तीन साईटवर जाऊन फवारणी करतो. कधीकधी मनुष्यबळ नसल्याने एकाच साइटवर जाऊन फवारणी केली जाते.
एका साइटवर एक दिवस कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना इमारतीच्या बांधकाम साइटवर डासांची उत्पत्तिस्थळे शोधावी लागतात. त्यासाठी तीन ते चार तास जातात. या साइटवर तीन अथवा चार कर्मचारी जातात. कधी कधी एका साइटवर संपूर्ण दिवस जातो.
एमएलओमुळे खात्माबांधकाम साइटवर हे कर्मचारी जातात तिथे पाणी साचू न देणे तसेच साचलेल्या पाण्यात एमएलओ (मॉस्किटो लार्व्हीसिडल ऑइल) ची फवारणी केली जाते. या एमएलओमुळे डासांच्या अळ्यांना ऑक्सिजन घेता येत नाही व अळ्यांचा मृत्यू होतो.