Join us

"अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ"; भाजपाचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 1:05 PM

शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच, शिवसेना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने शिवसेना ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसून येतात. त्यातच, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आदित्य ठाकरेंची सभा झाली. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चॅलेंज देत, माझ्याविरुद्ध निवडणूक लढा, असे आदित्य यांनी म्हटले. आदित्य यांच्या टीकेवर भाजपानेही पलटवार केला आहे.  

शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी केंद्र सरकार, भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने बोचरी टीका करताना दिसून येतात. नुकतेच, ठाण्यातील एका सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खुले आव्हान देताना टीका केली. यावर शिंदे गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर, भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनीही आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. 

कलानगरवरुन वरळी पर्यंत चार वर्षात पोहचू न शकलले आमदार आतावरळीतून पळ काढून एवढ्या लांब ठाण्याला कधी कधी पोहचणार त्यापेक्षा, श्रीमान आदित्य ठाकरे तुम्ही जिथे राहता, त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून का लढत नाही?, असा सवाल आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. तसेच, तिथे कुटुंबातीलच काही मते मिळणार नाहीत, याची भिती वाटते का?, अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ, असले धंदे बंद करा अशा शब्दात शेलार यांनी खोचक टोलाही लगावला आहे.  द्या तातडीने राजिनामा आणि करा आमचा सामना, असे आव्हानच शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे. 

काय म्हणाले आदित्य ठाकरे

हिंमत असेल तर राजीनामा द्या, तुमच्याविरुद्ध ठाण्यातून निवडणूक लढतो, असे खुले आव्हान देत, अमावस्या आणि पोर्णिमेलाच मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या गावी शेती करायला जातात. ते चंद्राच्या प्रकाशात कशाची शेती करतात? त्यांच्या गावी जायला रस्ताही नाही. पण दोन दोन हेलिकॉप्टर्स त्यांच्या शेतात उतरतात. असे हे राज्यातील गरिब शेतकरी असल्याचा खोचक टोला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला. आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी पलटवार केला आहे. 

शिंदें गटाचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या, ज्याला दोनशे तीनशे लोक होती. स्वतःला उबाठा गटाचे युवराज समजणाऱ्यांच्या सभेला पाचशे लोकही येत नाही. २०१९ ला वरळीमधून ते लढले. पण दोन दिग्गच माजी आमदारांना विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली? ज्यांना निवडून यायला दोन विधान परिषदेच्या जागा द्यावा लागतात आणि नंतर विधानसभा निवडणूक लढवावी लागते. त्यांनी विधानसभा लढवण्याचे चॅलेंज देणे हे हास्यास्पदच असून, मुख्यमंत्र्यांवर भाष्य करू नये, अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेआशीष शेलारठाणेशिवसेनाभाजपा