शुद्ध भाषा असं काही नसतं, माझी भाषा ही माझी आहे; नागराजचं परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 04:14 PM2023-01-17T16:14:40+5:302023-01-17T16:41:19+5:30
शुद्ध असं काही नसतं. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतो.
मुंबई - सैराटफेम दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. न केवळ बोलण्यात तर वागण्यात देखील मंजुळे यांचा साधेपणा दिसून येतो. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यात कलाकार प्रवीण डाळींबकर याने घरी येण्याची विनंती केली, तेव्हा नागराज हे शहरातील भीमनगर येथील डाळींबकरच्या घरी पोहोचले होते. नागराज मंजुळेंचा हा साधेपणाच अनेकांना भावतो. त्यांच्या भाषेतही ओढून ताणून शब्दप्रयोग नसतात, तर मनात आहे तेच ओढावर दिसते, तोच साधेपणा भाषेतही जाणवतो. आता. भाषा या विषयावरही नागराज यांनी तितक्याच परखडपणे आपलं मत मांडलं आहे.
शुद्ध असं काही नसतं. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतो. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं हा असतो, अशा शब्दात भाषा या शब्दाची व्याख्यात नागराजने मुंबईतील एका कार्यक्रमात केली. नागराजने येथील कार्यक्रमात मोटीव्हेशनल स्पीकरची भूमिकाच निभावली, अशा शब्दात त्याचं भाषण झालं. माझ्यासारख्या खेड्यातील दगड फोडणाऱ्याच्या मुलाला मी काही तरी करू शकतो, या आत्मविश्वासानं मला इथपर्यंत आणलं, असेही नागराज यांनी म्हटले. तर, भाषेची शुद्धता आणि सुंदरता यावरही परखडपणे आपले विचार मांडले.
‘तुझं दिसणं, तुझं जगणं यावर मात कशी केलीस?’, असा प्रश्न नागराजला या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावरही त्याने भूतकाळातील आठवणी सांगत परखडपणे विचार मांडले. ‘लहानपणी मलाही माझ्या दिसण्यावरून न्यूनगंड होता. पण आता तो नाही. सौंदर्य ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सौंदर्याची व्याख्या खरं तर मला अलीकडंच कळू लागली. गोरेपणा म्हणजे सौंदर्य नव्हे. साधी-साधी दिसणारी माणसंही मला सुंदर वाटतात. काहीच काम न करणाऱ्या हातांपेक्षा राबणारे हात मला सुंदर वाटतात’, असं उत्तर नागराजने दिलं. त्यावर, उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली.
दरम्यान, जिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगीही नागराजने भाषेवर भाष्य केलं होतं. दर्शकांना जे कळलेले असते, ते बरेचदा फिल्ममेकर्सना समजत नाही. आशयासाठी तंत्रज्ञान राबते. गोष्ट सांगणारा कोण आहे, काय सांगायचे आहे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहेत. वेरूळला एलोरा का म्हणतात, हा प्रश्न उपस्थित करत आपलेपणा जपा, असे मंजुळेने म्हटले होते.