तीन वर्षे मागणीनुसार औषधांचा पुरवठाच नाही! वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची कबुली
By संतोष आंधळे | Published: October 4, 2023 08:07 AM2023-10-04T08:07:36+5:302023-10-04T08:08:11+5:30
दहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात औषध, साधनसामग्रीचा तुटवडा
संतोष आंधळे
मुंबई :नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या दुर्दैवी मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या औषध खरेदी धोरणातील अनास्था उघड होत आहे. गेल्या तीन वर्षांत शासकीय रुग्णालयांनी मागणी केलेल्या औषधांचा आणि आवश्यक वैद्यकीय सामुग्रीचा पूर्णपणे पुरवठाच झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत अनेक औषधे आणि यंत्रसामुग्रीची खरेदी झालेली नाही, अशी कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नांदेडच्या रुग्णालयांतील मृत्यूमागे औषधांचा तुटवडा कारणीभूत आहे की रुग्णालयातील संसर्ग जबाबदार आहे, याची तपासणी करण्याचे आदेश दिल्याचेही मुश्रीम यांनी सांगितले.
मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी याआधी नांदेडला रुग्णालयात औषध पुरवठा मुबलक असल्याचे सांगितले होते. त्यासंबंधीचे सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र पानावर आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत १० महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात औषध आणि साधनसामुग्रीचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना मेडिकलमधून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. विशेष म्हणजे २०२१ ते २०२४ या वर्षांत रुग्णालयांनी मागणी केलेल्या औषधांची पूर्तता झालेली नाही. औषध आणि साधनसामुग्रीची २०१७ ला हाफकिन महामंडळामार्फत खरेदी केली जाईल, असा निर्णय झाला. मात्र २०१७ ते २०२३ मार्च या कालावधीत हाफकिन महामंडळात १३ संचालकांच्या बदल्या झाल्या.