मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधींचीभारत जोडो यात्रा अकोल्यात पोहोचली असून अभिनेत्री रिया सेन सकाळपासूनच यात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. मात्र, दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजप नेते आणि शिंदे गटातील खासदार आक्रमक झाले आहेतय खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी राहुल गांधींवर टीका केली. तसेच, त्यांची यात्रा थांबवावी, अशी मागणीही केली होती. आता, या मागणीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, या यात्रेला प्रतिसाद मिळत नाही, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही यात्रा थांबवायला कोणाकडे वेळ नाही, असे म्हटले.
राहुल गांधी यांच्या यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यांची यात्रा थांबवायला कोणाकडेही वेळ नाही. इथे महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. त्या विषयावर राज्य सरकार काम करत आहे. तुम्हाला तुमचं अस्तित्व जिवंत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, काहीही वक्तव्य करत आहात. त्याकडे बघण्यासाठी भाजपला वेळ नाही, आम्हाला लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष घालायचे आहे. लोकांचे प्रश्न समजुन घेऊन ते सोडवायचा प्रयत्न हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेते आहेत, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तसेच, सत्ता गेल्यानंतर उध्दव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीकाही पडळकर यांनी केली.
यात्रा थांबवून दाखवाच - राहुल गांधी
खा. शेवाळे यांच्या या मागणीवर पत्रकारांनी विचारेल्या प्रश्नाला राहुल गांधींनी उत्तर दिलं. यात्रा रोखायची असेल तर रोखा, प्रयत्न करा. तुम्हाला यात्रेत काही चुकीचे वाटत असेल, जरूर रोखा, असे आव्हानच राहुल गांधींनी दिले. आम्हाला भारताला जोडायचे आहे. ही यात्रा म्हणजे एक विचार आहे. एक काम करण्याची पद्धत आहे. भाजपच्या द्वेषपूर्ण, हिंसात्मक एकीकडे विचार आहे. तर आमचं प्रेमाचं, बंधुभावाचा विचार आहे, असेही राहुल म्हणाले.