पहिल्या दिवशी गणवेश नाहीच, पालिकेची खरेदी प्रक्रिया अपूर्ण : वाटपासाठी ऑगस्ट उजाडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 12:17 PM2024-06-09T12:17:45+5:302024-06-09T12:18:02+5:30
Mumbai News: शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडून अद्याप गणवेश आणि शालेय साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाही पहिल्या दिवशी गणवेश आणि साहित्य मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई - शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र, मुंबई महापालिकेकडून अद्याप गणवेश आणि शालेय साहित्याची खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाही पहिल्या दिवशी गणवेश आणि साहित्य मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्टमध्ये त्यांना ते मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येत असून, त्यासाठी जूनच्या सुरुवातीला कार्यादेश देण्यात आला. सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये मुलांना शालेय वस्तू मिळतील, असेच चित्र आहे. पालिकेकडून शालेय वस्तूंच्या खरेदीस दरवर्षीच विलंब होत असतो. यंदाही तीच परंपरा कायम राहिली आहे. खरेदी प्रक्रियेस विलंब होत असल्याने निविदा प्रक्रिया डिसेंबर-जानेवारीतच पूर्ण करण्याचा निर्धार पालिकेने केला होता. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय वस्तू मुलांना मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.
पालिका शाळेतील मुलांना २००७ पासून गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी, छत्र्या आणि रेनकोट आदी वस्तू दिल्या जातात. एखाद वर्षाचा अपवाद वगळता अन्य शैक्षणिक वर्षात कधीही शाळेच्या पहिल्या दिवशी या वस्तू मुलांना मिळालेल्या नाहीत. शाळा सुरू झाल्यानंतर या वस्तू पुरविण्यास किमान दोन महिने लागतात.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शालेय साहित्याची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर कंत्राटदारांचे प्रस्ताव मंजूर करून संबंधितांना या महिन्यात कार्यादेश देण्यात आले आहेत.
मागील वर्षी शालेय वस्तू वेळेत न मिळाल्यामुळे तत्कालीन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला धारेवर धरत वस्तू वेळेवर देण्यास भाग पडले होते.
पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ४ जुलै २०२३ रोजी वस्तू खरेदीसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मात्र, निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश देण्यास विलंब झाला आहे.