‘पवित्र’द्वारे शिक्षकांची चुकीची भरती नाही; मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 08:55 IST2025-03-07T08:55:11+5:302025-03-07T08:55:22+5:30
प्रश्नोत्तराच्या तासात आ. इद्रीस नायकवडी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

‘पवित्र’द्वारे शिक्षकांची चुकीची भरती नाही; मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारावरच शिक्षकांची भरती होत आहे. त्यात कोणतीही चुकीची भरती झालेली नाही. शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये संबंधित शिक्षक उमेदवाराचे ज्या माध्यमातून शिक्षण झाले आहे, त्याच माध्यमातील शाळांमध्ये त्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात आ. इद्रीस नायकवडी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक करताना त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजेच डीएड, बीएड हे त्याच भाषेत झाले असल्यासच नियुक्ती देण्यात येते. यामुळे सर्वच विषयांमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होऊन दर्जेदार शिक्षण देण्यासाठी उमेदवाराचे इयत्ता १० वीचे माध्यम विचारात घेतले जाणार आहे, असे भुसे यांनी सांगितले.