मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कारशेडची जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाने गती घेतली असली, तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात ही जागा आली नसल्याची स्थिती आहे. त्यातून जागेअभावी या कारशेडच्या कामाला अजून सुरुवात झाली नाही. परिणामी, कारशेडअभावी ही मेट्रो मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या मुंबई-ठाणे प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किलोमीटर मार्गिकेच्या उभारणीचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. तर, मेट्रो ४अ ही २.७ किमी लांबीची मार्गिका असेल.
पाच टप्प्यांत काम या दोन्ही मार्गिकांवर मिळून ३२ स्थानके असतील. मेट्रो ४ मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पाच टप्प्यांत काम सुरू आहे. मेट्रो ४ मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथे एकत्रित कारशेड उभारण्यात येणार होते.मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादात कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी मिळू शकली नाही. परिणामी हे कारशेड मोघरपाडा येथे हलविण्यात आले.
मोघरपाडा येथील १६१ शेतकरी बाधित- मोघरपाडा येथील सरकारी जागेवर १६१ शेतकरी बाधित होत आहेत. यातील भाडेतत्त्वावर जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना २२.५ टक्के विकसित भूखंड, तर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना १२.५ विकसित भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- मात्र, मोघरपाडाची जागाही अद्याप एमएमआरडीएच्या ताब्यात आली नाही. एमएमआरडीएने कारशेडच्या कामासाठी यापूर्वीच कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. मात्र, जागेच्या अभावी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. त्यातून या कारशेडच्या कामाला कधी सुरुवात होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेट्रो ४ लांबी ३२.३२ किमीमेट्रो ४ अ लांबी २.७ किमीस्थानके - ३२ प्रकल्प खर्च१४,५४९ कोटी रुपये
कंत्राटदार बदलण्याची वेळ- एमएमआरडीएने या मेट्रो मार्गिकेच्या कामाला एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात केली होती. त्यावेळच्या नियोजनानुसार ऑक्टोबर २०२२ ही मेट्रो मार्गिका सुरू होणे अपेक्षित होते.- मात्र, काेरोना आणि मेट्रो कारशेडच्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने मार्गिकेला विलंब झाला. तसेच, दोन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळ एमएमआरडीएवर आली. - सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकेची सुमारे ७२ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. त्यातून आता कारशेडची जागा ताब्यात आल्यानंतरही दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.