शिंदेंच्या दसरा मेळाव्याला नरेंद्र मोदी अन् अमित शाह उपस्थित राहणार?; दिल्लीत आमंत्रण दिल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:13 PM2022-09-23T16:13:23+5:302022-09-23T16:15:50+5:30
एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत.
मुंबई- दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकारण तापलं आहे. मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिंदे गटासह ठाकरे गटाचीही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर सध्या युक्तिवाद सुरु आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
दसरा मेळावा होणारच! शिवाजी पार्क न मिळाल्यास शिवसेनेचा 'प्लान बी' तयार, शोधून काढला जबरदस्त पर्याय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रणही दिल्याचं सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्यानं मंचावर युतीमधील मोठ्या नेत्यांनाही आणण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो.
दिल्ली दौऱ्यावर असताना आज केंद्रीय गृहमंत्री श्री. @AmitShah जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.#delhipic.twitter.com/t20cpmtl9A
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2022
आता दोन्ही गटातील वाद पाहाता हायकोर्ट काय निकाल देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसऱ्याबाजूला शिंदे गटाच्या मेळाव्याला बीकेसीतील एमएमआरडी मैदानाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क न मिळाल्यास शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये होणार हे निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंनी गट प्रमुखांच्या मेळाव्यातही आक्रमक भूमिका घेत शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा होणार असा ठाम निर्धार बोलून दाखवला आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क मैदान न मिळाल्यास जवळच असलेल्या शिवसेना भवनासमोरील रस्त्यावर मेळावा घेण्याचा शिवसेनेचा प्लान बी असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाजी पार्क मिळालं नाही. तर एका बाजूला मुंबईचा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांचा जनसागर अशी सांगड घालत थेट गिरगाव चौपाटीवर मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. गिरगाव चौपाटीसोबतच महालक्ष्मी रेसकोर्स आणि शिवसेना भवनासमोरील रस्त्यासाठीचीही शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.