Join us

फटाकेबंदीबाबत राज्यात संभ्रमच फार; खरेदीला मुभा, वाजविण्यावर बंधने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:44 AM

लोकमतने राज्यातील महानगरांमध्ये घेतलेल्या आढाव्यात फटाकेबंदीबाबत गोंधळात गोंधळ असल्याचेच चित्र आहे.

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील महापालिका व जिल्हा प्रशासनाने फटाके फोडण्याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या असून त्यातून नवाच संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रसिद्ध केलेल्या प्रदूषित शहरांच्या यादीतील महानगरांमध्येही बंधने आहेत. 

मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगण, खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील महानगरांमध्येही सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.  मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर या मार्गदर्शक सूचना जारी झाल्याने फटाके विक्रेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. लोकमतने राज्यातील महानगरांमध्ये घेतलेल्या आढाव्यात फटाकेबंदीबाबत गोंधळात गोंधळ असल्याचेच चित्र आहे.

हरित लवादाचे निर्देश

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सर्व प्रकारच्या फटक्यांची विक्री व फटाके वाजविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असून ती ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीर्पयत लागू राहणार आहे.

मुंबई : विक्रीचा गाेंधळ

मुंबईत सगळीकडे फटके विकले जात आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे व घराचे अंगण इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके म्हणजे फुलबाजी, अनार यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे.मात्र कोणते फटाके विकायचे, कोणते नाही? याबाबत खूप गोंधळ आहे. विशेषत: किरकोळ आणि होलसेल अशा दोन्ही विक्रेत्यांमध्ये गोंधळ आहे. काहींवर कारवाई केली जात आहे. यात नुकसान विक्रेत्याचे होते, असे किरकोळ फटाके विक्रेत्यांनी सांगितले.

ठाणे : स्टाॅलच नाही

महापालिकेने आधीच फटाके विक्री स्टॉलला परवानगी नाकारली आहे. ठाण्यासह, कल्याण- डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सुमारे ५५० स्टॉल आता लागणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिका हद्दीत दरवर्षी २५० च्या आसपास स्टॉल विक्रीला परवानगी दिली जाते. 

नवी मुंबई : विक्री बंद

नवी मुंबई महापालिकेने नियमांचे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या माध्यमातून यावर्षी शहरात फटाके विक्री स्टॉलला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे फटाके विक्री बंद आहे.

नागपूर : आता निर्बंध

नागपूर शहरात फटाके विक्रीला बंदी केलेली नाही. मात्र महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याला निर्बंध घातले आहेत. तसेच मोठ्या आवाजाचे फोडण्याला बंदी घातली आहे. दुसरीकडे फटाके विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली. आधी परवानगी दिली व आता फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेनेही हवेची गुणवत्ता लक्षात घेवून मध्यम श्रेणीतील पर्यावरणपुरक फटाके उडविण्यास मुभा दिली. पर्यावरणपूरक फटाके फोडण्याची परवानगी आहे. 

औरंगाबाद : निर्णय नाही

महापालिका प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. शासनाकडून अधिकृतपणे फटाके उडविण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय आल्यानंतरच पाऊल उचलण्यात येईल, असे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांचे म्हणणे आहे. सध्या फटाके विक्री जोरात सुरू आहे. लातूरमध्ये व्यापाऱ्यांचे नाहरकतसाठी प्रस्ताव दाखल झाले आहेत. शहरात प्रांगणात फटाक्यांची दुकाने सुरू झाली असून, जवळपास ४४ व्यापाऱ्यांनी नाहरकतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. 

टॅग्स :दिवाळीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस