Join us

नारायण राणेंच्या बंगल्याची आज पालिकेकडून पुन्हा पाहणी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:51 AM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू परिसरातील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या शक्यतेमुळे सोमवारी  मुंबई पालिकेच्या पथकाकडून तपासणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू परिसरातील बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या शक्यतेमुळे सोमवारी  मुंबई पालिकेच्या पथकाकडून तपासणी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बंगल्यात राणे कुटुंबीयातील कुणीही उपलब्ध नसल्याने  अधिकारी तपासणीविनाच परतले होते. या प्रकरणामुळे शिवसेना व राणे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगल्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आरटीआय कार्यकर्ते संतोष जोंधकर यांनी राणे यांच्या जुहूमधील बंगल्याचे  बांधकाम नियमबाह्य पद्धतीने केल्याची तक्रार केली आहे. त्यामध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी पालिकेकडे केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा स्मरणपत्र पाठविले होते. त्यानंतर पालिकेच्या  अंधेरीतील के-पश्चिम विभागाने गुरुवारी  राणे यांना तपासणी करण्याबाबत नोटीस पाठवली होती. त्यानुसार शुक्रवारी चार अधिकाऱ्यांचे पथक तपासणीसाठी गेले होते. मात्र, त्यावेळी राणे कुटुंबीयातील कोणी सदस्य उपस्थित नसल्याने तपासणी व मोजमाप न करता पथक माघारी परतले. 

बंगल्याला नोटीस का?के वेस्ट वॉर्ड अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राणे यांना एमएमसी ॲक्टअंतर्गत सेक्शन ४८८ अन्वये  राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. के-वेस्ट वॉर्ड आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक  जुहू तारा रोडवरील अधीश बंगल्यावर येऊन तपासणी आणि बेकायदा बांधकामाबाबत मिळालेल्या तक्रारीची खात्री करून घेणार असल्याचे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :नारायण राणे मुंबई महानगरपालिका