बंद पुलाच्या कामांसाठी वेळापत्रकच हवे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:41 AM2019-05-09T02:41:04+5:302019-05-09T02:41:37+5:30
दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने त्यांच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावरील पूल बंद करण्याचा सपाटा लावला. दुरुस्ती-देखभाल, पुनर्बांधणी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हे पूल बंद केले गेले. वस्तुत: ते लगेचच कोसळले असते, असे नव्हे. पण दीर्घकाळ अशा पुलांकडे केलेले दुर्लक्ष रेल्वेला भोवले
अंधेरीच्या गोखले पुलालगतचा पादचारी पूल रेल्वेमार्गावर पडल्यानंतर कमकुवत पुलांचा; आणि त्याची जबाबदारी रेल्वेकडे आहे की मुंंबई महानगरपालिकेकडे हा मुद्दा गाजला. जबाबदारी टाळण्याचा खेळ दोन्ही यंत्रणांत रंगला. नंतर न्यायालयाने दिलेल्या तंबीनंतर जबाबदारी स्पष्ट झाली, तसेच दोन्ही यंत्रणांच्या ताब्यातील पुलांच्या आॅडिटचा निर्णय घेतला गेला. परंतु हे आॅडिट, पाहणी, पुलांची दुरुस्ती-देखभाल पुरेसे काळजीपूर्वक केले गेले नसल्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकालगतचा हिमालय पूल कोसळल्यानंतर दिसून आले. त्या कामातील हलगर्जी प्रवाशांना भोवली. परिणामी, हा पूल कोसळल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला गेला. ते प्रकरण सध्या न्यायालयात आहे. मात्र त्या दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने त्यांच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावरील पूल बंद करण्याचा सपाटा लावला. दुरुस्ती-देखभाल, पुनर्बांधणी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हे पूल बंद केले गेले. वस्तुत: ते लगेचच कोसळले असते, असे नव्हे. पण दीर्घकाळ अशा पुलांकडे केलेले दुर्लक्ष रेल्वेला भोवले, कारवाईची धास्ती होती. त्यातून त्यांनी पूल बंद करण्यास सुरुवात केली. परिणामी, त्या त्या स्थानकांतील अन्य पुलांवर प्रचंड ताण आला. गाडीतून उतरून बाहेर पडणारे प्रवासी १०-१५ मिनिटे स्थानकांतच अडकून पडू लागले. चेंगराचेंगरीची स्थिती उद््भवली. आताही सीएसएमटी, माटुंगा, दादर, कुर्ला, विक्रोळी, भांडुप, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, मरिन लाइन्स, चर्नी रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, खार रोड, विलेपार्ले, भार्इंदर, गुरू तेगबहादूर नगर अशा विविध स्थानकांतील पूल सध्या बंद आहेत. मात्र त्यांचे काम नेमके कधी पूर्ण होईल, हे सांगण्यास रेल्वेचे अधिकारी तयार नाहीत. बंद पुलांच्या जागी फ्लेक्स लावून त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
वस्तुत: एखादा पूल बंद करताना त्याच्या कामानुसार नेमका किती काळ लागेल, हे ठरविणे रेल्वेला कठीण नाही. प्रत्येक कामासाठीचे त्यांचे कंत्राटदारही ठरलेले आहेत. त्यामुळे पूल बंद करतानाच त्याचे कोणते काम केले जाणार आहे? त्याला किती काळ लागेल? ते काम नेमके किती दिवसांत पूर्ण होईल? याचे वेळापत्रक ठरवून ते दर्शनी भागात लावणे रेल्वेला सहज शक्य होते. मात्र रेल्वेने ते कोठेही केलेले नाही. त्यामुळे ‘पूल बंद आणि कोंडी सुरू’ अशी अवस्था प्रवाशांची झाल्याकडे ‘लोकमत’च्या वाचकांनी लक्ष वेधले आहे.
सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे दुरुस्ती, देखभालीच्या कामांसाठी वेगवेगळे पूल बंद केले जात आहेत. पण ते तोडून त्या जागी नव्याने होणाऱ्या कामासाठी कोणतीच कालमर्यादा नसल्याने महिनोंमहिने हे काम खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. अनेक स्थानकांत तर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होत आहे. त्यावर ‘लोकमत’च्या वाचकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पूल बंद करतानाच त्याचे काम कधी पूर्ण होईल, याचे वेळापत्रक रेल्वेने ठरवायला हवे. प्रत्येक कामाच्या टप्प्याचा त्यात समावेश हवा, असे म्हणणे त्यांनी मांडले आहे. ते नसेल, तर धोकायदाक ठरवून पूल बंद करून प्रवाशांचे हाल का करता, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांच्या होणाºया हालासाठी त्यांनी रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराला आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे.
पर्यायी
व्यवस्थाही उभारा!
रेल्वेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अशा प्रकारे पुलांचे काम करणे योग्य नाही. अशाने अपघाताची शक्यता आहे. पूल दुरुस्ती युद्धपातळीवर व्हायला हवी. कारण पावसाळ्यात पुलांवर कोंडी होऊ शकते. गर्दीच्या वेळा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नियोजन करायला हवे. जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही.
- उदय वाघवणकर,
जोगेश्वरी (पूर्व)
नियोजनशून्य कारभार
रेल्वेने पाहणी करून लगेचच ठिकठिकाणचे पूल बंद केले. पण ते करताना काम कधी पूर्ण होईल हे ठरविले नाही. त्यांच्या या नियोजनशून्य कारभाराचा फटका प्रवाशांना बसतो आहे. गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होते आहे. याला रेल्वेचे अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. - प्रसन्न पाटील, दिवा
ज्येष्ठांचाही विचार करा
पादचारी पुलांची पुनर्बांधणी करताना ज्येष्ठांचा विचार करा. पायºया फार उंच असणार नाहीत, त्यांवरील लाद्या गुळगुळीत नसतील; शिवाय आधारासाठी पुलावर दांड्या असतील याची काळजी घ्यायला हवी. पुलावर पुरेसा उजेडही हवा. - पद्माकर कुळकर्णी, ठाणे
पूल हवेशीर असावेत
नव्याने पूल बांधताना ते अधिक रूंद बांधायला हवेत. दादर, डोंबिवली येथे पुलांची कामे करताना गुळगुळीत लाद्या बसविल्याने प्रवासी घसरून पडतात. पावसाळ्यात हा त्रास अधिक होतो. दादर स्थानकात मध्यभागी असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाºया पुलाच्या सर्व बाजू बंद केलेल्या आहेत. तेथे गर्दीच्या वेळी प्रवाशांचा जीव गुदमरतो. तसे न करता काम करताना पूल हवेशीर राहतील याची काळजी घ्यावी. भरपूर नैसर्गिक प्रकाश येईल, असे पाहावे.
- पुष्पा सोनार,
कळवा
कोपरचा पूलही तोडा
कोपर स्थानकात सध्या असलेला पूल शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडतो. तोच पूल तिकीट खिडकीला वळसा घालतो आणि तोच पुढे पनवेल-वसई मार्गावरील फलाटांना जोडतो. तेथेच तिकीट खिडकी आहे. त्यामुळे पुलावर प्रचंड कोंडी, चेंगराचेंगरी होते. १०-१५ मिनिटे अडकून पडावे लागते. त्यामुळे हा पूल तोडून अधिक रूंद बांधायला हवा. त्यावरील तिकीट खिडकी बाजूला सरकवायला हवी. तेथे कोंडी होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी.
- परेश म्हात्रे, कोपर
वसईतील पुलाचा भूलभुलैया
वसई रोड स्थानकात विरारच्या दिशेने असलेल्या आणि वसई-पनवेलकडे येणाºया गाड्यांच्या फलाटाला जोडणाºया पुलाला विचित्र मोठा वळसा आहे. शिवाय तो अरुंदही आहे. तो पूल तोडून नव्याने बांधायला हवा.
- परिजा पंडित, वसई
पुलाच्या कामापासून प्रवासी अनभिज्ञ
मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची पायपीट वाढली आहे. मात्र पुलाचे दुरुस्तीचे काम, पुन्हा नवा पूल केव्हा पूर्ण होईल, यासंदर्भात प्रवाशांना कोणतीही माहिती दिलेली नाही.
- सन्नी रोकडे, शहाड
कुर्ल्यातील पूल लवकर पूर्ण करा!
रेल्वे प्रशासनाने कुर्ला स्थानकातील दोन पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे इतर पुलांवरील गर्दीचा भार वाढला आहे. प्रवाशांना पूर्ण स्थानकाला फेरी मारून आपल्या इच्छित डब्यांपर्यंत पोहोचावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने या पुलाचे काम लवकरात लवकर करणे आवश्यक आहे.
- कृष्णा बनसोडे, वांद्रे (पू.)
पुलावरील कोंडीसाठी योजना हवी
मुंबईत पुलाच्या दुर्घटना घडल्यानंतर तरी सगळ्या सरकारी खात्यांनी आणि विभागांनी वेगाने काम करणे अपेक्षित होते. सुरक्षित प्र्रवासासाठी दुरुस्ती आवश्यक आहे. मात्र अनेक स्थानकांत एक पूल बंद आणि एक सुरू अशी स्थिती आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरीसारखी स्थिती होते. त्यावर लवकर मार्ग काढण्यासाठी आणि बिकट होत जाणारा व भेडसावणारा प्रवाशांचा प्रश्न यावर गंभीरपणे विचार करून मार्ग शोधणे ही काळाची गरज आहे. यासाठी पर्यायी नव्हे, कायमस्वरूपी योजना हवी.
- कमलाकर जाधव, बोरीवली (पूर्व), मुंबई
कालमर्यादा आवश्यक
डोंबिवलीतील कल्याण दिशेकडील पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र इतर पुलांवर फेरीवाल्यांनी बाजार मांडल्यामुळे प्रवाशांना येथून जाताना त्रासाला सामोरे जावे लागते. उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. लाखो प्रवासी लोकलने दररोज प्रवास करतात. त्यामुळे पादचारी पूल पाडताना किंवा दुरुस्त करताना किती वेळ लागेल, याची कालमर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. विशेषत: पुलांचे काम युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्थानकातील रेल्वे मार्गावरील पुलांचे काम जलद गतीने होणे आवश्यक आहे.
- मुरलीधर धंबा, डोंबिवली