नागरी समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन असणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:12+5:302021-02-05T04:35:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपल्या संकुलातील नागरी समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन होणे गरजेचे असल्याचे मत एमएमआरडीएचे समाज विकास अधिकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या संकुलातील नागरी समस्या सोडविण्यासाठी फेडरेशन होणे गरजेचे असल्याचे मत एमएमआरडीएचे समाज विकास अधिकारी पी. जी. स्वामी यांनी व्यक्त केले. दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा, म्हाडा कॉलनी, जगन्नाथ कॉम्प्लेक्स येथे शिवसेना उपनेते व म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गृहनिर्माण संस्थांची फेडरेशन नोंदणीविषयक मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी स्वामी यांनी, याठिकाणी १२ गृहनिर्माण संस्था असून, फेडरेशन स्थापन करण्यासाठी कमीत कमी पाच संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
मुंबईसारख्या शहरात आपण राहत असलेली जमीन आपल्या नावाने असणे भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. गावाकडे प्रत्येकाची जमीन आपल्या नावे असते, मात्र मुंबईत असे अपवादात्मक सापडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण राहत असलेल्या गृहनिर्माण संस्थेचा विकास होण्यासाठी फेडरेशन असणे किती अत्यावश्यक आहे याबाबत त्यांनी उपस्थित नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
विनोद घोसाळकर यांच्यासारखे नेतृत्व आपल्याला लाभल्याचे नागरिकांना सांगत लवकरच या संस्थेचे फेडरेशन स्थापन होईल असे सांगितले. या प्रभागातील नगरसेविका देखील आपल्यासोबत असून, आपल्या वसाहतींच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी केल्यास त्या लवकरच सोडविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सहायक समाज विकास अधिकारी वंदना सोनवणे यांनीदेखील उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, याठिकाणी इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती घोसाळकर यांनी दिली. तसेच सोसायटीची मालमत्ता सदस्यांच्या नावे होण्यासाठी कन्व्हेन्स प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर या माध्यमातून संस्थेतील कमिटी व सदस्यांमधील सुसंवाद करणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख राजू इंदुलकर, शाखा संघटक ज्युडीथ मेंडोसा यांसहित मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
----------------–--------------------------