मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना शिवसेना-भाजपामधील वाद वाढत असल्याची चिन्हे दिसत आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपावर निशाणा साधण्यात येत आहे. भाजपाला कोंडीत पकडताना सामना संपादकीयमधून भाजपा नेत्यांवर नेहमी टीका करण्यात येते. त्यामुळे भाजपाच्या बचावासाठी संघाचं मुखपत्र असलेल्या तरुण भारतमधून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक असल्याची टीका तरुण भारतने अग्रलेखातून केली. मात्र या टीकेवर उत्तर देताना ज्याप्रकारे मुख्यमंत्री सामना वाचत नाही, तसं आम्ही पण सामनासोडून काही वाचत नाही, तर तरुण भारत वृत्तपत्र आहे का? हेच माहीत नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी तरुण भारतची खिल्ली उडविली आहे. त्यामुळे येत्या काळात तरुण भारत आणि सामना यांच्यातील सत्तासंघर्ष पाहायला मिळू शकतो.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना संध्याकाळी भेटायला जाणार असल्याचं सांगितले. भगतसिंह कोश्यारी एका राज्याचे मुख्यमंत्री होते, तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहाचे ते सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे. त्यांचे मार्गदर्शन घेतलेले आहे. निवडणुकीच्या काळात त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आज आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेणार आहोत. तसेच राज्यातील सत्ता स्थापनेबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करणार आहोत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
तरुण भारतच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले आहे. या अग्रलेखात म्हटलं आहे की, महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे अशा शब्दात शिवसेनेवर प्रहार केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर जोरदार प्रहार
संजय राऊत यांनी 'औकात' काढली; शिवसेना, भाजपामधील तणाव वाढणार?
राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका होणार?; तयारीला लागण्याचे भाजपा मंत्र्याचे कार्यकर्त्यांना आदेश
..म्हणून शिवसेना घेणार राज्यपालांची भेट; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'