Join us

इमारतीत होणाऱ्या बेकायदा बदलांबाबत कारवाई नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 4:36 AM

दोन वर्षांपूर्वी घाटकोपर येथील साईसिध्दी इमारत ही अंतर्गत बदलांमुळे कोसळली होती.

मुंबई : दोन वर्षांपूर्वी घाटकोपर येथील साईसिध्दी इमारत ही अंतर्गत बदलांमुळे कोसळली होती. या दुर्घटनेत १७ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही येथे इमारतींमध्ये असे अंतर्गत बदल राजरोस सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून कारवाई होत नसल्याने रहिवाशी हवालदिल झाले आहेत.घाटकोपर पूर्व येथील पारसनाथ इमारतीला महापालिकेकडून आवश्यक सर्व कागदपत्र घेण्यात आल्यानंतर काही रहिवाशांनी आपल्या खोल्यांमध्ये तोडफोड करून अंतर्गत बदल केले. याबाबत २०१७ पासून याच इमारतीतील रहिवाशी ब्रिजेश पांडे यांनी एन विभाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. या बेकायदा बदलबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर विभाग कार्यालयाने एमआरटीपी अंतर्गत डिसेंबर २०१७ मध्ये ३३ फ्लँटधारकांना नोटीस पाठविली.२०१८ मध्ये बेकायदा बदल करणाºयांवर एक महिन्यांत कारवाई करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले. मात्र अद्याप कोणतीच कारवाई होत नसल्याची तक्रार पांडे यांनी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली. वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसून तक्रारदारालाच नोटीस पाठविण्यात येत असल्याची दाद पांडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे मागितली आहे.