बेकायदा बदलांबाबत तक्रारीनंतरही कारवाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:07 AM2019-01-22T02:07:15+5:302019-01-22T02:07:17+5:30
दोन वर्षांपूर्वी घाटकोपर येथील साईसिद्धी इमारत ही अंतर्गत बदलांमुळे कोसळली होती.
मुंबई : दोन वर्षांपूर्वी घाटकोपर येथील साईसिद्धी इमारत ही अंतर्गत बदलांमुळे कोसळली होती. या दुर्घटनेत १७ रहिवाशांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतरही घाटकोपरमधील इमारतींमध्ये असे अंतर्गत बदल राजरोस सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने स्थानिक रहिवासी हवालदिल झाले आहेत.
घाटकोपर पूर्व येथील पारसनाथ इमारतीला महापालिकेकडून आवश्यक सर्व कागदपत्रे घेण्यात आल्यानंतर काही रहिवाशांनी आपल्या खोल्यांमध्ये तोडफोड करून अंतर्गत बदल केले. याबाबत २०१७ पासून याच इमारतीतील रहिवासी ब्रिजेश पांडे यांनी एन विभाग कार्यालयाकडे तक्रार केली होती. या बेकायदा बदलांबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर विभाग कार्यालयाने एमआरटीपी अंतर्गत डिसेंबर २०१७ मध्ये ३३ फ्लॅटधारकांना नोटीस पाठविली.
उपायुक्त परिमंडळ सहा यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत मार्च २०१८ मध्ये बेकायदा बदल करणाऱ्यांवर एक महिन्यात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अद्याप कोणतीच कारवाई होत नसल्याची तक्रार पांडे यांनी आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे जनसुनावणीदरम्यान केली. वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसून तक्रारदारालाच नोटीस पाठविण्यात येत असल्याची दाद पांडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे मागितली आहे.
या प्रकरणी एन विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त कापसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.