Join us  

‘त्या’ शिवसैनिकावर अद्याप कारवाई नाही

By admin | Published: February 28, 2016 2:03 AM

कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाला, धक्काबुक्की करून मारहाण करणारा शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कालगुडेवर अद्यापही पक्षाकडून निलंबनाची कारवाई झालेली

ठाणे : कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाला, धक्काबुक्की करून मारहाण करणारा शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कालगुडेवर अद्यापही पक्षाकडून निलंबनाची कारवाई झालेली नाही. ती करण्याबाबत शिवसेनेच्या नेत्यांतच एकमत नसल्याचे चित्र समोर आले. निर्र्णय झाला, तरी कारवाई करणार कोण, याबाबतही संभ्रम कायम आहे.नितीन कंपनीच्या सिग्नलवर, गुरुवारी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाने मोबाइलवर बोलणाऱ्या शशिकांतला हटकले. मात्र, त्याच महिला पोलिसाला मारहाण, धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत, त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. एवढी मोठी घटना घडत असतानाही, तेथे उपस्थितांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. काहींनी तर याचे मोबाइलवर चित्रण केले. सायंकाळपर्यंत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. नंतर उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात शशिकांतवर गुन्हा दाखल झाला. या घटनेचा सर्वच स्तरांवरून निषेध करण्यात आला व शशिकांतवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. आधी तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे नाकारणाऱ्या शिवसेनेने, त्याच्या होर्डिंगपासून इतर सर्व पुरावे समोर आल्यावर मात्र, तो शाखाप्रमुख असल्याचे मान्य केले. त्याच्यावर पक्ष योग्य ती कारवाई करेल, असे मत शिवसेनेच्या नेते मंडळींनी व्यक्त केले आहे, परंतु ही कारवाई कोण करणार, यावर एकमत होत नसल्याने, कारवाई केव्हा होईल आणि मुंबईतून की ठाण्यातून, यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. शिवसेनेचा संबंध नाही : एकनाथ शिंदे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे. शिवसेनेचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, तो माजी पदाधिकारी आहे. तो कोणीही असता, तरी त्याच्यावर कारवाई झालीच असती. शिवसेनेने कधीही कोणालाच पाठीशी घातलेले नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.