गौरी टेंबकर - कलगुटकर।
मुंबई : शिवसेनेच्या मालवणी विभाग क्रमांक ३३मध्ये सहा महिन्यांपूर्वी शाखाप्रमुख म्हणून नेमणूक झालेल्या अमीरुद्दीन तालुकदार (३६) याला अटक करण्यासाठी आसामचे पोलीस मालवणीमध्ये दाखल झाले. त्याच्यावर आसाममध्ये निरनिराळे गुन्हे दाखल असून मालवणी पोलिसांसह आसाम पोलीस त्याच्या घरी पोहोचले; मात्र तोवर तो फरार झाला होता. आता तर त्याच्या नागरिकत्वाविषयीही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न, डांबून ठेवणे, घातक शस्त्राने इजा करणे आदी गुन्ह्यांत आसाम पोलिसांना हव्या असलेल्या अमीरुद्दीनला अटक करण्यासाठी ८ मार्च, २०१९ रोजी आसाम पोलिसांचे एक पथक अटकेचे वॉरंट घेऊन मुंबईत दाखल झाले. तालुकदार मालवणीत असल्याची माहिती त्यांना मिळाल्याने त्यांनी मालवणी पोलिसांकडे त्याला अटक करण्यासाठी मदत मागितली. स्थानिक पोलिसांसोबत जेव्हा आसाम पोलीस त्याच्या मालवणीतील घरी गेले तेव्हा तो फरार झाला होता. त्याच्या बाबतीत काहीही माहिती मिळाल्यास ती कळविण्याची विनंती आसाम पोलिसांनी मालवणी पोलिसांना केली आहे.
दरम्यान, स्थानिक आरटीआय कार्यकर्त्या सविता कुंबळे यांनी आसामी म्हणून ओळख सांगणाऱ्या तालुकदारच्या नागरिकत्वाची माहिती मालवणी पोलिसांकडे माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यात १० जानेवारी, २०१९ ला त्यांना लेखी उत्तर देण्यात आले. या उत्तरानुसार तालुकदारचे पणजोबा आसामी असल्याची नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन (एनआरसी)मध्ये नोंदच नसल्याचे कुंबळे यांना सांगण्यात आले. कुंबळे यांनी त्याच्या गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मागितली होती. या माहितीनुसार त्याच्यावर वीजचोरी, मारहाण, वृक्ष संरक्षण कायदा तसेच आणि विनयभंगासारखे गुन्हे दाखल असल्याचे त्यांना माहिती अधिकारांतर्गत सांगण्यात आले.