Join us

कचरा कंत्राटात ‘भेसळ’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:35 AM

कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करणा-या ठेकेदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात महापालिकेने तक्रार

मुंबई : कचऱ्यात डेब्रिजची भेसळ करणा-या ठेकेदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात महापालिकेने तक्रार केली. मात्र, नियमानुसार पाच गुन्हे माफ असल्याने, या ठेकेदारांना आता कचºयाचे कंत्राट पुन्हा एकदा मिळणार आहे. यापैकी मे. आर. एस. जे. (जेव्ही) आणि मे. डी. कॉन. डू ईट (जेव्ही) या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. उर्वरित सर्व ठेकेदार ‘धुतल्या तांदळासारखे’ असल्याचे पालिका प्रशासनाने आज जाहीर केले. विशेष म्हणजे, या ठेकेदारांना कंत्राट देण्याचा प्रस्ताव उद्या स्थायी समितीच्या बैठकीत येत असताना, प्रशासनाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे खुलासा करीत, या कंत्राटात अनियमितता नसल्याचे स्पष्ट केले आहे.मुंबईतील कचरा उचलण्यासाठी ठेकेदारांकडून भाड्याने वाहने घेण्यात येतात. मात्र, कचºयात डेब्रिजची भेसळ केल्याचा आरोप असलेल्या ठेकेदारांनाही संधी मिळाली आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटून, हे प्रस्ताव दोन आठवडे राखून ठेवण्यात आले होते. अखेर गेल्या बैठकीत काही प्रभागांमधील कचरा उचलण्याचे कंत्राट मंजूर करण्यात आले, तर आणखी चार प्रस्ताव उद्या होणाºया या आर्थिक वर्षातील शेवटच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रशासनाने आणले आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न उपस्थित केला होता.मात्र, स्थायी समितीमध्ये येणाºया एखाद्या प्रस्तावावर प्रशासनाने खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निविदा प्रक्रियेत कुठलीही अनियमितता नसून, २०१२च्या कंत्राट रकमेच्या तुलनेत २३ टक्क्यांची बचत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. मे. वेस्टलाइन (जेव्ही/जॉइंट व्हेंचर) व मे. एसटीसी इटीसी एमएई (जेव्ही) या ठेकेदारांच्या कामात कुठलीही अनियमितता नाही. मे. ए. वाय. खान (जेव्ही) या ठेकेदाराच्या वाहनात एकदा डेब्रिज आढळून आल्याने, १० हजार रुपये दंड करण्यात आला होता. मात्र, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले नाही, तर मे. क्लीन हार्बर (जेव्ही) यांचा भेसळ करताना हेतू वाईट नव्हता, अशी पाठराखण केली आहे.असा आहे नियम...कंत्राटामधील अटी व शर्तींनुसार कचरा वाहून नेणाºया वाहनामध्ये ‘डेब्रिज’ आढळल्यास संबंधित ठेकेदाराला दंड आकारण्यात येतो. यानुसार, पहिल्या वेळीस १० हजार, दुसºया वेळी २० हजार, तिसºया वेळी ३० हजार, चौथ्या वेळी ४० हजार रुपये असा दंड आकारण्यात येतो. मात्र, वाहनात पाचव्यांदा डेब्रिज आढळून आल्यास, संबंधित कंत्राटदारास ‘काळ्या यादीत’ टाकण्यात येते.तरी तो साव...मे. क्लीन हार्बर (जेव्ही) यांच्या वाहनात पाच वेळा काही प्रमाणात डेब्रिज आढळून आले, तरी डेब्रिजचे वजन वजा करूनही कचºयाचे सरासरी वजन ५.४ टनांपेक्षा जास्त होते. म्हणजेच ठेकेदाराने वजन वाढविण्याच्या हेतूने डेब्रिज मिसळवले नव्हते, हे स्पष्ट होते. ज्यामुळे कंत्राटातील अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले नसल्याने, त्यांच्यावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.या ठेकेदारांना कंत्राट : २०१८ ते २०२५ या सात वर्षांच्या कालावधीकरिता कचरा वाहन ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आलेल्या या चार प्रस्तावांपैकी, मे. वेस्टलाइन (जेव्ही / जॉइंट व्हेंचर), मे. एसटीसी इटीसी एमएई (जेव्ही), मे. ए. वाय. खान (जेव्ही) आणि मे. क्लीन हार्बर (जेव्ही) या ठेकेदारांशी संबंधित प्रस्तावांचा समावेश आहे.