मुंबई : राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यपालांनी १४ वी विधानसभा गठीत करण्याची प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी केला.
अॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुज आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राजकीय पेचप्रसंगावर चर्चा केली. त्यांनी काही पर्यायही राज्यपालांना सूचविले. आंबेडकर म्हणाले की, ज्या दिवशी शपथविधी होतो तो दिवस विधिमंडळाचा पहिला दिवस मानला जातो. २०१४ साली ८ नोव्हेंबरला शपथविधी झाला होता. तो कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे आज नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे.काय आहे ३५६ कलम?सरकार स्थापन करणे शक्य नसल्यास यावेळी निवडून आलेल्या ४-५ जणांना विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी पार पाडणे आवश्यक आहे. अन्यथा, विधानसभा गठित झाली असे मानता येणार नाही. या दोन्ही बाबी झाल्या नाहीत तर घटनेच्या ३५६ कलमानुसार राष्ट्रपती शासन लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे आंबेडकर म्हणाले.