मुंबई : एलएलएमची प्रवेश प्रक्रिया १० जानेवारी रोजी संपली आणि अवघ्या १२ दिवसांमध्ये परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर ताण आला आहे. विद्यापीठ लवकर परीक्षा घेत असल्याने, काही विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे, पण विद्यापीठाने परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यास नकार दिला आहे.मुंबई विद्यापीठात एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, एलएलएमचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एकच सेंटर आहे. मुंबईत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच एलएलएमच्या अभ्यासक्रमाचे वर्ग घेतले जातात. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांना आलेल्या नोकरीच्या संधी गेल्याने आर्थिक नुकसानदेखील झाले आहे. आधीच्या परीक्षेच्या निकालांना लेटमार्क लागल्याने अनेकांना मनस्ताप झाला.एलएलएमच्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आता वर्तविली जात आहे. अजूनही विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता २२ जानेवारीपर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत लेक्चर्स ठेवली आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा ताण वाढला आहे.अभ्यास करायला वेळ नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे या परीक्षेसंदर्भात पुनर्विचार करून फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घ्यावी, अशी मागणी स्टुडंटलॉ कौन्सिलतर्फे करण्यातयेत आहे.
एलएलएमच्या वेळापत्रकात बदल नाही, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:26 AM