काही परीक्षा घेण्यावाचून पर्याय नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 01:00 AM2020-06-12T01:00:49+5:302020-06-12T01:01:10+5:30
तज्ज्ञांचे मत; उच्च शिक्षणाच्या भविष्यावर दूरगामी परिणामांची व्यक्त केली भीती
मुंबई : विद्यार्थ्याने त्याला मिळालेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून नेमके काय अर्जित केले ? त्यातील किती आत्मसात केले, याचा आरसा दाखविणारी प्रक्रिया म्हणजे परीक्षा असते. परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्याला मिळणाऱ्या या अनुभवाच्या शिदोरीपासून तो वंचित राहू शकतो, असे मत तज्ज्ञांनी मांडले.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द झाल्यास महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाच्या भविष्यावरही दूरगामी परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.कोणत्या परीक्षा रद्द होणार याची स्पष्टता न आल्याने आता पुणे विद्यापीठ परीक्षांची तयारी करत असल्याचे समजते. एकूणच संदिग्धता कायम आहे. ज्या परीक्षा केवळ थिअरीवर आधारित आहेत त्या रद्द केल्या तरी चालेल, मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे योग्य ते वर्गीकरण करून निर्णय अपेक्षित आहे, असे कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले. तर परीक्षांसंदर्भात स्थापन केलेल्या राज्यातील कुलगुरूंच्या समितीने आपला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर केला. त्यातील सूचनांच्या निर्देशांचे पालन करून विद्यापीठांनी अंतिम परीक्षांची तयारी ठेवायलाच हवी. त्यानंतरही परीक्षांच्या काळापर्यंत अगदीच बिकट परिस्थिती उद्भवल्यास इतर पर्यायांचा विचार करावा लागेल, असे शिक्षणतज्ज्ञ आनंद म्हापुसकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.