मुंबई : कमला मिल आग प्रकरणी आरोपी असलेला ‘मोजोस बिस्ट्रो’ पबचा सहमालक युग तुली याची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. निष्काळजीपणाचा गुन्हा त्याच्यावर नोंदविण्यात आल्याने, उच्च न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला.२९ डिसेंबर २०१७ रोजी कमला मिलमधील ‘मोजोस बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या दोन पब्समध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ‘मोजोस बिस्ट्रो’चा सहमालक युग तुलीला जानेवारीत अटक केली. त्यानंतर, त्याने सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला. मात्र, सत्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे तुलीच्या जामीन अर्जावर सुनावणी होती.‘वन अबव्ह’मधून आगीची ठिणगी आल्याने आग पसरली, असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे, तसेच मोजोस बिस्ट्रोमध्ये आलेल्या ग्राहकांचा मृत्यू झालेला नाही, असा युक्तिवाद तुलीतर्फे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी केला.मात्र, सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी तुलीच्या जामिनाला विरोध केला. तुली व अन्य आरोपींनी निष्काळजीपणा केला. मुंबई पालिका व पोलिसांच्या चौकशीत मोजोस बिस्ट्रोमध्ये बेकायदेशीर चालविलेल्या हुक्का पार्लरमुळे आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला, असा युक्तिवाद शेट्टी यांनी केला. त्यावर तुलीच्या वकिलांनी तुली हुक्का पार्लरचा कारभार दैनंदिन स्वरूपात पाहात नव्हता, असे न्यायालयाला सांगितले. कमला मिल प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.
युग तुलीला दिलासा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:32 AM