पाॅलिटेक्निकसाठी सामाईक प्रवेश परीक्षा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:02+5:302021-06-19T04:06:02+5:30

उदय सामंत यांची माहिती; दहावी, बारावीच्या गुणपत्रिकेच्या आधारावरच प्रवेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इयत्ता दहावी किंवा बारावीच्या गुणांच्या ...

There is no common entrance exam for polytechnics | पाॅलिटेक्निकसाठी सामाईक प्रवेश परीक्षा नाही

पाॅलिटेक्निकसाठी सामाईक प्रवेश परीक्षा नाही

Next

उदय सामंत यांची माहिती; दहावी, बारावीच्या गुणपत्रिकेच्या आधारावरच प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इयत्ता दहावी किंवा बारावीच्या गुणांच्या आधारेच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी (पाॅलिटेक्निक) प्रवेश दिला जाईल. त्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेच्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण मराठी भाषेमध्ये घेण्ययाचा पर्याय यावर्षी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी एआयसीटीकडे परवानगी मागण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही तसे सुचविण्यात आल्याने मागणी मान्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाॅलिटेक्निकच्या प्रवेशासाठीच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजचे हाेते. आता ही अट बदलून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इयत्ता बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, ॲग्रिकल्चर, अभियांत्रिकी ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, एंटरप्रिन्युरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येईल.

महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमाक्षेत्रातील उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरताना संबंधित उमेदवार विवादित सीमा क्षेत्रामधील आहे, असा उल्लेख असणारे प्रमाणपत्र जोडावे लागत होते. यातील विवादित हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सीमा भागातील विद्यार्थ्यांस प्रवेश घेणे सोपे होईल. तसेच काश्मिरी विस्थापितांबरोबरच विस्थापित न होता काश्मीर खोऱ्यांमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडित आणि ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे, अशा उमेदवारांना प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

* शुल्क समिती गठित

महाराष्ट्र विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन ) अधिनियम -२०१५ नुसार समिती गठित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विजय लखीचंद आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश व शुल्क समिती काम पाहील. ही समिती पुढील वर्षासाठी नियुक्त करण्यात आली आहे. यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, सनदी लेखापाल मनोज चांडक, परिव्यय लेखापाल रत्नाकर फडतरे, व्यवसायिक शिक्षणतज्ज्ञ धर्मेंद्र मिश्रा सदस्य असतील.

............................

Web Title: There is no common entrance exam for polytechnics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.