कोस्टल रोडसाठी सल्लागार नाहीच; शिवसेनेची खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 02:20 AM2018-04-22T02:20:37+5:302018-04-22T02:20:37+5:30
प्रशासनाचे निवेदन शिवसेनेने फेटाळले : नव्या वादाला तोंड फुटले
मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पावर शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून हक्क सांगण्यात येत आहे. त्यामुळे उभय पक्षांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव विधी ग्राह्यता संपल्याचे कारण देत शिवसेनेने अडविला आहे. याबाबतचे पालिका प्रशासनाचे निवेदन शिवसेनेने नाकारले. या मुद्द्यावर भाजपा आक्षेप घेणार असल्याने त्यांच्या नगरसेवकांनी महासभेत हजेरी लावण्याआधीच झटपट हरकतीचा मुद्दा मांडून निवेदन फेटाळण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या या खेळीमुळे गाफील पहारेकरी मात्र चरफडत राहिले.
कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव गेला महिनाभर स्थायी समितीच्या पटलावर रेंगाळला होता. मात्र या प्रस्तावाच्या निविदेची ग्राह्यता २३ मार्चला संपल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे प्रशासनाने गृहीत धरले. यावर शिवसेनेने आक्षेप घेत स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे सल्लागार नेमण्याचे निवेदन पालिका प्रशासन पालिकेच्या महासभेत आज करणार होते. यामुळे शिवसेना-भाजपामध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
मात्र भाजपा व विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात येण्यापूर्वीच कोस्टल रोडचे निवेदन शिवसेनेने नाकारले. शिवसेनेचे नगरसेवक हजर असल्याने बैठकीसाठी आवश्यक तुल्यबळ पूर्ण होऊन बैठक सुरू करण्यात आली. त्या वेळेस विरोधी पक्षाचे चार ते पाच तर भाजपाचे दोन-चार नगरसेवक महासभेत उपस्थित होते. हीच संधी साधून सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रस्तावाची विधी ग्राह्यता संपल्यामुळे
निवेदन मांडता येत नसल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाला पुन्हा मंजुरीसाठी आणावा लागणार आहे.
अशी केली शिवसेनेने खेळी
कोस्टल रोडच्या प्रस्तावावर भाजपाने आव्हान दिल्याने महासभेत सत्ताधारी विरुद्ध पहारेकरी अशी खडाजंगी रंगेल, असे वाटत होते. मात्र महासभेसाठी आवश्यक नगरसेवकांचे संख्याबळ शिवसेनेनेच पूर्ण केले. यासाठी दुपारी अडीच वाजताची वेळ असूनही नेहमीच ४नंतर सुरू होणारे सभेचे कामकाज आज ठीक अडीच वाजता सुरू करण्यात आले. यामुळे गाफील राहिलेले भाजपाचे नगरसेवक व विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात वेळेत हजर होऊ शकले नाहीत. हेच शिवसेनेच्या पथ्यावर पडले.
भाजपाचे आव्हान
सत्ताधारी पक्षाने कितीही हरकती आणल्या तरी मुंबईच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाकरिता भाजपा कटिबद्ध आहे. विरोध करण्यासाठी छुपी कारणे शोधली जात आहेत. आम्ही हे वचन मुंबईतील जनतेला दिले आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे अडथळे आणि हरकती आल्या तरी हे प्रकल्प पूर्ण करून मुंबईकरांना या सेवा देणारच, असे आव्हान भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी दिले आहे.
यावर आक्षेप
कोस्टल रोडसाठी सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव ९ मार्च रोजी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने आणला. मात्र ३० दिवसांमध्ये यावर निर्णय न घेतल्याने हा प्रस्ताव नियमानुसार मंजूर झाल्याचा दावा प्रशासनाने केला. मात्र निविदेची ग्राह्यता २३ मार्च रोजी संपल्यामुळे त्या रद्द करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते. १२० कोटी रुपये खर्च करण्याचा हा प्रस्ताव निविदा ग्राह्यता संपल्याने महासभेत आज फेटाळण्यात आला.