यंदा चैत्यभूमीवर गर्दी नाही; ऑनलाइन अभिवादनाच्या आवाहनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:31+5:302020-12-06T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबरला, दादर येथील चैत्यभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबरला, दादर येथील चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायींचा महासागर उसळतो. यंदा कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी चैत्यभूमीवर न येण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. त्याला अनुयायींनी सहकार्य केल्याचे दिसून येत असून, चैत्यभूमीवर अनुयायी आले नसल्याचे पाहावयास मिळाले.
दरवर्षी ५ डिसेंबरपासूनच अनुयायींची चैत्यभूमीवर दर्शनासाठी गर्दी हाेते. यंदा ती दिसली नाही. अनुयायींचे हे सहकार्य ६ डिसेंबर रोजी अपेक्षित आहे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिका महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशन सदराखाली ई-पुस्तके विभागामध्ये ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती पुस्तिका २०२०’ या नावाने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
* मानवंदनेचे थेट प्रक्षेपण
प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येतादेखील अनुयायींना अभिवादन करता यावे, यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यमांवरून करण्यात येणार आहे.
...............................