बफर बदलण्याबाबत निर्णय नाही

By admin | Published: October 27, 2015 12:25 AM2015-10-27T00:25:44+5:302015-10-27T00:25:44+5:30

चर्चगेट स्थानकात लोकल बफरला आदळून मोठा अपघात झाल्याची घटना जून महिन्यात घडली. या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित तर झालाच शिवाय चर्चगेट

There is no decision to change buffer | बफर बदलण्याबाबत निर्णय नाही

बफर बदलण्याबाबत निर्णय नाही

Next

मुंबई : चर्चगेट स्थानकात लोकल बफरला आदळून मोठा अपघात झाल्याची घटना जून महिन्यात घडली. या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित तर झालाच शिवाय चर्चगेट स्थानकात असणारे जुने बफरही कुचकामी ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे हे बफर बदलण्यात यावेत, अशी सूचना अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीकडून करण्यात आल्यानंतरही फक्त एकच बफर बदलण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. तर अन्य बफर सध्यातरी बदलण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले.
२0१५च्या जून महिन्यात चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३वरील बफरला लोकल धडकली. यात बफरचे आणि लोकलचे मोठे नुकसान झाले. मुळात लोकलचा बफर आणि प्लॅटफॉर्मवरील बफर हे समोरासमोर आणि एकाच रेषेत नसल्याने अपघाताचे स्वरूप मोठे झाले. चर्चगेट स्थानकातील रूळ हे वर करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकलचा बफर आणि प्लॅटफॉर्मवरील बफर एकाच रेषेत नसल्याने अपघात मोठा झाल्याचे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे चर्चगेट स्थानकातील बफर हे जवळपास ८0 वर्षांपेक्षा जास्त जुने असून, त्यांची मुदत संपली आहे. यासंदर्भात चार सदस्यीय समितीकडून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अहवालात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या. १२ डबा, १५ डबा आणि २४ डबा क्षमता झेलण्याची क्षमता बफरमध्ये असली पाहिजे, असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. तसेच त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.
असे असतानाही पश्चिम रेल्वेकडून फक्त अपघात झालेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३वरील बफर बदलण्याचा निर्णय झालेला आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ४वरील बफर हे बदलण्यात येणार नाहीत. याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्म क्रमांक ३वरील बफर बदलण्यासाठी जवळपास १ कोटीचा खर्च आहे. यासाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल. मात्र अन्य प्लॅटफॉर्मवरील बफर बदलण्यात येणार नसल्याचे कुमार यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: There is no decision to change buffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.