मुंबई : मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अतिरिक्त बेडची सोय व्हावी, यासाठी ४८ आयसोलेशन कोच तयार आहेत. यासाठी लागणारी यंत्रणा तेथे कार्यान्वित केली, मात्र राज्य सरकारने अद्याप तशी मागणी केलेली नाही.
देशात कोरोनाची पहिली लाट येताच केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने झोनच्या ठिकाणी रेल्वे डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये केले. मध्य रेल्वेलाही तशा सूचना प्राप्त होताच मागील वर्षी मध्य रेल्वेने ४८० आयसोलेशन कोचची व्यवस्था केली होती. मात्र, कोचला मागणी नव्हती आणि विशेष गाड्यांसाठी डब्यांची आवश्यकता होती. त्यामुळे काही कोचचे पुन्हा प्रवासी डब्यांत रूपांतर केले होते, मात्र ४८ आयसोलेशन कोच ठेवले होते.
दरम्यान, मुंबईत राज्यातून आणि राज्याबाहेरून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांची तपासणी सध्या पालिका प्रशासन करत आहे. येथे अँटिजेन चाचणी केली जात आहे.
* असे आहेत कोच
दादर, पनवेल, इगतपुरी यार्डमध्ये ४८ आयसोलेशन कोच सज्ज असून, यात बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन ऑक्सिजन सिलिंडर आहेत. एका कोचमध्ये ९ कम्पार्टमेंट आहेत. एका कम्पार्टमेंटमध्ये राज्य शासनाने त्यांच्या गरजेनुसार २ बेड ठेवल्यास एका कोचमध्ये साधारण १६ आणि एक कम्पार्टमेंट वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारे एकूण ४८ कोचमध्ये मिळून ७६८ बेड्स उपलब्ध होऊ शकतात.
* जनजागृतीवर भर
मुंबई विभागात आयसोलेशन कोचची मागणी असेल तर जिल्हाधिकारी व राज्य शासनाद्वारे कळविल्यास असे कोच पाठविता येतात. पण, अद्याप तशी मागणी आलेली नाही. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची आरक्षण तपासणी, मास्क घातले की नाही याची तपासणी रेल्वे विभाग करीत आहे. तसेच उद्घोषणा, पॅम्पलेटद्वारे जगजागृती केली जात आहे.
- वरिष्ठ अधिकारी, मध्य रेल्वे