Join us

वडिलांच्या मृत्यूबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय नाही, न्या. लोया यांच्या मुलाचे मुख्य न्यायमूर्र्तींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 5:53 AM

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निधनासंदर्भात आमचा कोणत्याही प्रकारचा संशय नाही, असे पत्र लोया यांचे पुत्र अनुज लोया यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश मंजुळा चेल्लूर यांना येथे स्वत: भेटून दिले.

मुंबई : विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या निधनासंदर्भात आमचा कोणत्याही प्रकारचा संशय नाही, असे पत्र लोया यांचे पुत्र अनुज लोया यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश मंजुळा चेल्लूर यांना येथे स्वत: भेटून दिले.माझ्या वडिलांच्या निधनाबद्दल काही माध्यमातून प्रश्न उपस्थित केल्यानंतर या घटनेसंदर्भात झालेल्या चौकशीबाबतही मला शंका नाही, असे अनुज यांनी या पत्रात म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य न्यायाधीशांना भेटण्यासाठी अनुज लोया आज मुंबईत आले होते. या घटनेनंतर प्रारंभीच्या काळात काही लोकांनी आमच्या कुटुंबीयांची सांत्वनेसाठी भेट घेताना काही गोष्टी सांगितल्या. पण, त्यानंतरच्या काळात आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती कळली आणि आपल्या वडिलांचे निधन हे हृदयविकारानेच झाले, याची आम्हाला खात्री पटली. त्यामुळे चौकशी यंत्रणांवर आमचा कुठेही अविश्वास नाही आणि त्यावेळी माझ्या वडिलांसोबत मुंबई उच्च न्यायालयातील जे न्यायाधीश होते, त्यांच्यावर सुद्धा आमच्या कुटुंबीयांचा पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.न्या. ब्रिजगोपाल लोया हे नागपूर येथे एका विवाह समारंभासाठी गेले होते आणि तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात नेले, तेव्हा दोन न्यायाधीश त्यांच्यासोबत होते. तेथील प्रथमोपचारानंतर जेव्हा त्यांना मेडिट्रिना इस्पितळात हलविण्यात आले. तेव्हाही न्या. मोहित शाह, न्या. भूषण गवई व इतर काही न्यायाधीश त्यांच्यासोबत होते. ज्या ईश्वर बाहेती यांचा संदर्भ प्रसारमाध्यमात आला होता, ते बाहेती आमच्या कुटुंबासाठी काकांसारखे आहेत आणि ३५ वर्षांपासून ते आमच्या कुटुंबांसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आमचा कुठलाही संशय नाही, असेही अनुज लोया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :न्यायालयखून