मुंबई : क्रूझ ड्रग्जप्रकरणी आरोपी आर्यन खान याची २८ ऑक्टोबर रोजी जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी त्यासंबंधीच्या आदेशाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली. आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमून धमेचा हे केवळ क्रूझवर गेले म्हणून त्यांच्यावर कट रचल्याचा गुन्हा नोंदविण्यासाठी हे समाधानकारक कारण नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एनसीबीला मोठा धक्का दिला आहे.
आर्यनच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचेही निरीक्षण न्या. नितीन सांब्रे यांनी १४ पानी जामीन आदेशात नोंदविले आहे. आर्यनच्या फोनमधून मिळविलेले चॅट पाहिले असता त्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले नाहीत. तसेच अरबाझ व मुनमून यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण स्वतंत्रपणे विचारात घेतले तर ते अल्प आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाचे निरीक्षण संबंधित गुन्ह्यात आरोपी असलेल्या आरोपींनी बैठक घेऊन कट रचल्याचे अनुमान काढण्यासाठी कोणतेही सकारात्मक पुरावे तपास यंत्रणेने सादर केले नाहीत.
अर्जदारांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आणि ही कबुलीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा मानली जाते, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. काही काळ हे मान्य जरी केले, तर संबंधित गुन्ह्यासाठी केवळ एक वर्ष शिक्षा होऊ शकते. आरोपींनी २५ दिवस कारागृहात काढले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा आरोपींनी अमली पदार्थांचे सेवन केले होते, हे सिद्ध करण्यासाठी आरोपींची वैद्यकीय चाचणीही केली नाही.