वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; उपचार प्रक्रियेत मात्र ठरते महत्त्वाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रेमडेसिविरची मागणी प्रचंड वाढलेली असताना जागतिक आरोग्य संघटनेने या इंजेक्शनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिविर कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काेराेना रुग्णाला रेमडेसिविर दिल्यामुळे मृत्युदरात घट झालेली नाही. मात्र रुग्णांच्या रुग्णालयातील उपचार करण्याच्या कालावधी घट झाली, असे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदविले आहे. रेमडेसिविर हे इबोलावर औषध म्हणून विकसित करण्यात आले होते. मात्र, रेमडेसिविर हे अन्य काही विषाणूंवर प्रभावी ठरू शकते. ते शरीरात काेरोना विषाणूंची संख्या वाढवणाऱ्या एन्झाइमलाच अटकाव करते. त्यामुळे विषाणू शरीरात फैलावत नाहीत, अशी माहिती विषाणू तज्ज्ञ डॉ. विकास बनसोडे यांनी दिली.
रुग्णाच्या लक्षणांची तीव्रता किती आहे, यावर या विषाणू संसर्गाचा जोर कमी करणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची परिणामकारकता ठरते. टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या इंजेक्शनचा वापर केला तर मागणी कमी हाेऊन ज्यांना खरेच गरज आहे, त्यांच्यासाठी हे औषध योग्य वेळी वापरता येईल, याकडे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी लक्ष वेधले. इतर व्हायरल तापांप्रमाणे सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या काेरोनाच्या लक्षणांवर व्यवस्थित लक्ष ठेवून घरीही उपचार घेता येतात. रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही तर आपले काय हाेईल, या विचाराने रुग्ण व्यथित होतात. मात्र व्यथित हाेण्याचे किंवा घाबरण्याचे कारण नाही. हे इंजेक्शन संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात, कोणते आजार असलेल्या रुग्णांना द्यावे हे डॉक्टर ठरवतात. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होतानाच रेमडेसिवीर द्या, असा आग्रह धरतात. मात्र यामागे काेणतेही वैद्यकीय तथ्य नाही, असे डॉ. भारमल यांनी सांगितले.
* डॉक्टरांना वैद्यकीय उपचारांची दिशा ठरवू द्या!
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रेमडेसिविरचा परिणाम सुरुवातीच्या १० दिवसांमध्ये दिसून येतो. याला ‘स्टँडर्ड केअर’ म्हणून पाहता येणार नाही, असे मत डॉ. गिरीश जैन यांनी मांडले. त्यामुळे हे इंजेक्शन मिळवण्यासाठी विनाकारण अस्वस्थ होऊ नका. डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांची दिशा ठरवू द्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
--------------------