मुंबई : घाटकोपर असल्फा येथील उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अखेर समोर आला आहे. मात्र पालिकेचे पथक घटनास्थळी चौकशीसाठी गेले असताना सदर मॅनहोलवर झाकण असल्याचे दिसून आले. मॅनहोलवरील झाकण त्यादरम्यान काढण्यात आल्याचे अथवा सदर महिलेला गटारात पडताना पाहिल्याचे कोणतेही प्रत्यक्षदर्शी पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.३ ऑक्टोबर रोजी घाटकोपर येथील उघड्या गटारामध्ये शीतल डामा ही महिला पडल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. मात्र तिचा मृतदेह ४ ऑक्टोबर रोजी हाजीअली जवळील समुद्रात सापडला. ही महिला घाटकोपर असल्फा येथे नाल्यात किंवा मॅनहोलमध्ये पडली असेल, तर तिचा मृतदेह हाजीअलीपर्यंत पोहोचला कसा, याची चौकशी करण्याचे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिले होते. मात्र १५ दिवसांच्या चौकशीनंतरही महापालिकेला निष्कर्ष काढता आलेला नाही. ही महिला मॅनहोलमध्ये पडल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. तसेच जिथे महिला पडल्याचे सांगितले जात होते, तिथले झाकण निघालेच नव्हते. तसेच सीसीटीव्ही देखील उपलब्ध झाले नाहीत किंवा एकही प्रत्यक्षदर्शी मिळाला नाही. त्या गटाराचा प्रवाह हा माहिमकडे जातो, परंतु मृतदेह हाजीअलीला कसा गेला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पालिकेमार्फत पोलिसांमध्ये एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याने या प्रकरणाचा शोध आता पोलिस घेणार आहेत.
३ ऑक्टोबर रोजी घाटकोपर येथील उघड्या गटारामध्ये शीतल डामा ही महिला पडल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. मात्र तिचा मृतदेह ४ ऑक्टोबर रोजी हाजी अली जवळील समुद्रात सापडला.