मुंबई - जळगाव - येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सभागृहात राज्य सरकारवर निशाणा साधला. विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारपासून (१ मार्च) सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी जळगावमधील घटनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार संवेदनशील नसल्याचं म्हटलंय. याबाबत, आता गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
जळगावच्या शासकीय वसतिगृहासंदर्भातील बातमीनंतर 6 विविध खात्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने संपूर्ण घटनेची चौकशी केली, जळगावमधील आशादीप शासकीय वसतिगृहात जाऊन, तेथील महिलांना भेटून विचारपूस केली. जवळपास 41 साक्षीदारांशी त्यांनी भेटून एक अहवाल दिला आहे. विविध 6 खात्यांच्या या महिला अधिकाऱ्या होत्या, त्यांनी अहवाल दिला असून त्या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय.
20 फेब्रुवारी रोजी त्या होस्टेलमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम करावा म्हणून, गाणी म्हटली, डान्स केला. त्यावेळी, एका महिला गरबा डान्स करत असताना तिला त्रास होऊ लागला, त्यामुळे तिने अंगावरील ब्लाऊजसारखा ड्रेस काढला, त्यावेळी तिथे कुणीही पुरुष पोलीस अधिकारी नव्हता. तेथे केवळ महिला पोलीस अधिकारीच होत्या आणि एकूण 17 महिल्या होत्या. रत्नमाला सोनार या महिलेनं तक्रार केलीय, पण या महिलेच्या वेडसरपणाबद्दलच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे, 6 वरिष्ठ महिलांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार जळगावात पोलिसांनी महिलांना नाचविल्याची कुठलिही घटना घडली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी दिलंय.
फडणवीसांकडून चौकशीची मागणी
जळगावमधील घटनेचा उल्लेख करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई-बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांची बाजू लावून धरली. लोकशाहीमुळे सरकार बरखास्तीची मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे, मुनगंटीवारांच्या मागणीत काही गैर नाही, कारण संदर्भातील घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. केवळ एखादी बातमी असती तर गोष्ट वेगळी होती. पण, त्या मुलीला नग्न करुन पोलीस नाचवत आहेत, ही व्हिडिओ क्लीप याठिकाणी आलीय. त्यामुळे, आपण संवेदनशीलतने तात्काळ कारवाई करावी, यासाठी ही तळमळ असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात म्हणाले की, आमच्या राज्यातील आई- बहिणींना नग्न करुन नाचायला लावलं जात आहे. यासंबंधिचे सर्व व्हिडिओ देखील असताना तुम्ही आम्ही नोंद घेऊ, असं सांगतात अशी टीका सुधीर मुनगंटीवार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली आहे. यासोबतच आता राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. यासाठी मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई- बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीनंतर या सदर घटनेची चौकशी चालू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशी झाल्यानंतर दोन दिवसांत तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.