मुंबईतील ५० टक्के शाळांचे फायर ऑडिट झालेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:28 AM2019-01-23T02:28:05+5:302019-01-23T02:28:10+5:30
मुंबईत वाढत्या आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना व खबरदारी घेण्याची सूचना महापालिका प्रशासन करीत असते.
मुंबई : मुंबईत वाढत्या आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना व खबरदारी घेण्याची सूचना महापालिका प्रशासन करीत असते. मात्र पालिकेच्याच दिव्याखाली अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या ४४२ शाळांचे अद्याप फायर आॅडिट झालेले नाही. मुंबईतील ११०३ अनुदानित व विना अनुदानित शाळांपैकी केवळ २८२ शाळांची तपासणी झाल्याचे उजेडात आले आहे.
मुंबईत दररोज सरासरी १० ते १२ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात. आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन व आग विझविण्यासाठी आवश्यक साधने अनेक आस्थापना व इमारतींमध्ये नसल्याचे आढळून आले आहे. अशा इमारतींना नोटीस पाठवून आवश्यक बदल करण्यासाठी मुदत देण्यात येते.
बहुतांशी नागरिक नियम धाब्यावर बसवून अशा दुर्घटनांना आमंत्रण देत असतात. पालिका शाळांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने जागरूक राहून विशेष काळजी घेण्याची सूचना शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी आज केली.
या वेळी माहिती देताना ४४२ शाळांचे अद्याप फायर आॅडिट झालेले नाही, असे उपायुक्त मिलिन सावंत यांनी मान्य केले. तसेच ११०३ खाजगी अनुदानित, विना अनुदानित शाळांपैकी केवळ २८२ शाळांची तपासणी
झाली आहे. याची गंभीर दखल
घेऊन सर्व शाळांचे फायर आॅडिट लवकर करण्याचे निर्देश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दिले.