Join us

विकासासाठी निधी मिळालाच नाही

By admin | Published: April 22, 2016 2:14 AM

महापालिकेच्या निवडणुका होवून एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या वर्षभरामध्ये शहरात एकही महत्त्वाचा प्रकल्प उभा राहिला नाही.

नामदेव मोरे, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होवून एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. या वर्षभरामध्ये शहरात एकही महत्त्वाचा प्रकल्प उभा राहिला नाही. आर्थिक व पाणीटंचाईचा फटका शहरवासीयांना बसला आहे. निधी नसल्याने कामे झाली नाहीत व प्रभाग समित्यांची रचना झाली नाही. यामुळे हक्काचा नगरसेवक निधीही वापरता आला नसल्याची खंत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २२ एप्रिल २०१५ ला मतदान झाले. निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी नागरिकांना भरपूर आश्वासने दिली. नागरिकांनी निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांचा पराभव केला. अनेक आजी, माजी नगरसेवकांचा पराभव झाला. तरुणांवर शहरवासीयांनी मोठ्या प्रमाणात विश्वास दाखविला. २१ ते ३० वयोगटातील १८ उमेदवार जिंकून आले. अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. निवडणुका होताच सर्वच नगरसेवकांनी विकासकामांची यादीच पालिका प्रशासनाकडे सादर केली. वर्षभरामध्ये प्रत्येक सभेमध्ये १०० पेक्षा जास्त ठराव मांडण्यात आले. आयुक्त व महापौरांसह पक्षाच्या नेत्यांकडेही वारंवार पाठपुरावा केला. प्रभागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक नगरसेवकांचा भ्रमनिरास झाला आहे. अनेक प्रभागांमध्ये एकही विकासकाम झाले नाही. वर्षभर निधी नसल्याचे कारण सांगण्यात आले. विकासकामे ठप्प झालीच परंतु शहरात पहिल्यांदाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. अनेक नगरसेवकांना पाणीटंचाईच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील एकही महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला नाही. ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनचे काम पूर्ण होवू शकले नाही. ऐरोली, नेरूळ व सीबीडी रुग्णालयही सुरू झालेले नाही. प्रभागामधील गटारांवर झाकणे टाकण्याचे कामही अनेक ठिकाणी पूर्ण करता आले नाही. महापालिकेसाठी पूर्ण वर्ष निराशाजनक ठरले आहे. आर्थिक स्थिती खालावल्यामुळे नवीन कामे करता आली नाहीत. शासनाने एलबीटी रद्द केल्याने मोठा आर्थिक स्रोत बंद झाला. शहरामध्ये आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. निवडणुकीपूर्वी स्मार्ट सिटी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक आला होता. पहिला क्रमांक मिळविण्यासाठी स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले, त्यासाठी तयारीही केली. परंतु स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एसपीव्ही व इतर जाचक अटी मान्य नसल्याचे कारण देवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेच ठराव फेटाळून लावला. पूर्ण वर्ष ‘स्मार्ट’ सिटीच्या गोंधळामध्येच गेले. प्रभागामधील छोटी विकासकामे करण्यासाठी नगरसेवक व प्रभाग समिती निधी खूप महत्त्वाचा असतो. परंतु वर्षभरामध्ये या समित्याच स्थापन न झाल्याने पूर्ण निधी पडून राहिला आहे. नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्यामुळे नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. घणसोली सिडको नोड व इतर काही प्रभागामध्ये एकही काम होवू शकले नाही. > प्रभाग समित्यांचे राजकारण प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागामध्ये छोटी व अत्यावश्यक कामे करता यावीत यासाठी नगरसेवक निधी व प्रभाग समिती निधीची तरतूद असते. परंतु निवडणुकीनंतर काही महिन्यांनी प्रभाग समित्या स्थापन झाल्या. चुकीच्या समित्यांच्या रचनांमुळे मुख्यमंंत्र्यांनी समित्या बरखास्त केल्या. वर्ष पूर्ण झाले तरी पुन्हा समित्यांची निवड न झाल्याने हक्काचा निधीही नगरसेवकांना वापरता आला नाही.