ठाणे : आशिया खंडात सगळ्यात समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय झाला असला तरी जिल्ह्याच्या कृषी अर्थकारणाची वाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन मात्र, तूर्तास होणार नाही त्यास किमान दोन वर्षाचा कालावधी जावा लागेल. जिल्ह्याचे विभाजन करणे हा अधिकार राज्याच्या अखत्यारित असला तरी बँकेची नोंदणी आणि नियंत्रण या बाबी रिझर्व्ह बँकेच्या अधिकार कक्षेत आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेची नव्याने नोंदणी करावी लागेल. ती होऊन तिला मंजुरी व बँक व्यवसायाचा परवाना मिळाल्यानंतर ती अस्तित्वात येईल. त्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसई, डहाणू, पालघर, तलासरी,विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार या तालुक्यातील शाखा, ठेवी, कर्जे, मालमत्ता, भागभांडवल, राखीव निधी आदी बाबींचे नियमानुसार विभाजन होऊन ते नव्या बँकेकडे वर्ग केले जाईल. तसेच या तालुक्यातील ठाणे जिल्हा बँकेचे संचालकही नव्या बँकेकडे वर्ग होतील. त्याचप्रमाणे कर्मचारी आणि प्रशासन यांचेही विभाजन होईल. साधारणत: ही प्रक्रिया पार पडण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी जात असतो. परंतु विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे आचारसंहितेत बराच कालावधी जाईल. त्याचप्रमाणे या निवडणुकानंतर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये जिल्हा बँकही असणार आहे. हे ध्यानी घेता, विभाजनासाठी लागणारा काळ हा दोन वर्षांपेक्षा अधिकही असू शकतो. (विशेष प्रतिनिधी)
जिल्हा बँकेचे तूर्तास विभाजन नाही
By admin | Published: June 14, 2014 2:33 AM