मुंबईत एक इंचही सुधारणा नाही! उच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:33 AM2017-09-03T03:33:18+5:302017-09-03T03:33:31+5:30
मुसळधार पाऊस पडला की मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होते. हे नित्याचेच असूनसुद्धा गेली कित्येक वर्षे मुंबईची स्थिती सुधारली नाही, असे उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीत म्हटले.
मुंबई : मुसळधार पाऊस पडला की मुंबापुरीची ‘तुंबापुरी’ होते. हे नित्याचेच असूनसुद्धा गेली कित्येक वर्षे मुंबईची स्थिती सुधारली नाही, असे उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीत म्हटले. निसर्गावर नियंत्रण ठेवू शकत नाही; मात्र मुंबईत एक इंचही सुधारणा झाली नाही, असा टोला पाऊसकोंडीबाबत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला लगावला.
मुंबईत पावसाचे भाकीत अगदी अचूक करण्यासाठी दुसरे डॉप्लर बसविण्यात यावे, यासाठी व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले.
‘आपण निसर्गावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मात्र मुंबईत हे पहिल्यांदा घडत नाही. आपण एक इंचही पुढे सरकलेलो नाही,’ असे न्यायालयाने म्हटले. दुसरे डॉप्लर बसविण्याबाबत काहीच पावले उचलली जात नसल्याची बाब याचिकाकर्त्यांचे वकील सी.के. नायडू यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. ‘दुसºया रडारसाठी जागा देण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र प्रीमियम रेटवरून जागेचा प्रश्न सुटत नाही,’ असे नायडू यांनी न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
दरम्यान, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले. मुंबईची तुंबापुरी झाली आणि सर्वच स्तरातून पालिकेवर टीकेची झोड उठली
आहे. पालिकेने मात्र या सर्वांसाठी मुसळधार पावसाला जबाबदार
धरले आहे.
जबाबदारी महापालिकेची
खड्डे पडलेल्या रस्त्यांची तक्रार तत्काळ विभाग कार्यालयाकडे द्या, अशी सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना करण्यात आली आहे. स्टील प्लेट्स वापरून विसर्जनाच्या मार्गातील खड्ड्यांचा इलाज मंडळांकडे आहे. मात्र, खड्ड्यांमुळे मिरवणुकीला विलंब झाल्यास त्यास पालिका जबाबदार असेल, असा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी नरेश दहिबावकर यांनी दिला आहे.